सचिन कुंडलकर यांच्या पोस्टला जितेंद्र जोशीने दिले सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 01:21 PM2018-08-25T13:21:09+5:302018-08-25T13:21:38+5:30

दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी सोशल मीडियावर एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली असून त्या पोस्टला अभिनेता जितेंद्र जोशीने सडेतोड उत्तर दिले आहे.

Jitendra Joshi gave a stunning reply to Sachin Kundalkar's post | सचिन कुंडलकर यांच्या पोस्टला जितेंद्र जोशीने दिले सडेतोड उत्तर

सचिन कुंडलकर यांच्या पोस्टला जितेंद्र जोशीने दिले सडेतोड उत्तर

googlenewsNext


ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचे काल निधन झाले. त्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी व अनेक जणांनी दुःख व्यक्त केले. तसेच चित्रपटसृष्टीतील कलाकारांनीदेखील विजूमामांच्या निधनावर दुःख व्यक्त केले. तर दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी सोशल मीडियावर एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली. विजय चव्हाण आजारी असताना कोणी त्यांची भेट घेण्यासाठी गेले होते का, असा सवाल करीत विजय चव्हण यांचा उल्लेख ‘मामा’ म्हणून करत त्यांच्याशी नाते जोडू पाहणारे त्यांच्या आजारपणात कुठे होते, असे विचारणाऱ्या सचिन कुंडलकर यांना या प्रश्नाचे सडेतोड उत्तर आता कलाकार मंडळी देत आहेत.
अभिनेता जितेंद्र जोशीने कुंडलकर यांची पोस्ट शेअर करत, त्याला उत्तर देत लिहिले की, सचिन कुंडलकर, काय कमाल लिहिता हो तुम्ही पण गंमत अशी की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असे म्हणतात. परंतु ती संधी तुम्ही आम्हाला देऊच शकत नाही कारण विजय चव्हाण यांना आम्ही मामा म्हटलेले तुम्हाला चालत नाही परंतु सुमित्रा भावेंना तुम्ही एकेरी नावाने हाक न मारता मावशी म्हणता आणि महेश एलकुंचवारांचा उल्लेख महेशदा असा करता. बरे कसे आहे ना की हे आम्हाला लहानपणापासून शिकवले आहे आमच्या घरच्यांनी. ज्याला आम्ही संस्कार असे म्हणतो त्यानुसार आमच्या घरी कामाला येणाऱ्या बाईलासुद्धा मावशी आणि रिक्शा टॅक्सीवाल्या वयस्कर गृहस्थाला अत्यंत सहजतेने काका/मामा म्हणतो आणि हे कुणीतरी बळजबरी केली म्हणून नव्हे. तर तसा भाव आमच्या मनात प्रकट होतो आपोआप. तुम्ही अभ्यासू आणि होऊ घेतलेले विचारवंत आहात म्हणून आणखी खोलात जाऊन याचा विचार केल्यास असे लक्षात येते की बाप राखुमादेवीवरु असे म्हणणाऱ्या ज्ञानोबारायांना आम्ही माऊली म्हणतो. साधी मुक्ताबाई परंतु आमच्या तोडून ‘मुक्ताई’ म्हणत त्या भावंडांच्या आणखी जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. तर अशी परंपरा आणि संस्कार लाभलेले आम्ही भारतीय तुमच्या त्या फ्रांस आणि इटलीमध्ये जाऊनसुद्धा तिथल्या एखाद्या गोऱ्याला अंकल किंवा अंटी असेच संबोधतो. कारण ते आम्हाला आपसुक येते आणि आम्हाला त्याची लाज वाटत नाही.
मी एकाच चित्रपटात काम केले त्यांच्यासोबत परंतु तरीही ते माझे विजुमामा झाले कारण त्यांनी माझ्यासारख्या नवख्या मुलाची प्रचंड काळजी घेतली. बरे बाकी अशोक मामा, नीना ताई, वंदना मावशी , मोने काका यांच्याविषयी नंतर कधीतरी सांगीन तुम्हाला. राहता राहिला प्रश्न अमेय, उमेश यांच्या काका आणि स्पृहा, सई, अमृता, पर्ण यांच्या मावश्या /आत्या होण्याचा तर माझी मुलगी आत्तापासूच त्यांना अशीच हाक मारते याचे कारण संस्कार!!
तुमची पोस्ट वाचून तुम्हाला कालच उत्तर देणार होतो परंतु तुम्हाला नसलेले सोयर सुतक पाळुया असे ठरवले. शिवाय व्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा आहेच. असा नट होणे नाही, रंगभूमी पोरकी झाली असो मी म्हणणार नाही परंतु आम्हा मुलांच्या मनातल्या एका कोपऱ्यातील एक जागा रिकामी झाली हे नक्की, अशा शब्दांत जितेंद्र जोशीने सचिन कुंडलकर यांना खडेबोल सुनावले. 


 

Web Title: Jitendra Joshi gave a stunning reply to Sachin Kundalkar's post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.