आयटीआय उत्तीर्णही देऊ शकतील दहावी, बारावीची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 11:58 PM2018-06-02T23:58:11+5:302018-06-02T23:58:11+5:30
आयटीआय प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाची संधी देण्यासाठी सरकारने दहावी आणि बारावी इयत्तेला समकक्षता देण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : आयटीआय प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाची संधी देण्यासाठी सरकारने दहावी आणि बारावी इयत्तेला समकक्षता देण्याचा निर्णय घेतला आहे.
दहावी अनुत्तीर्ण मात्र आयटीआय पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना यापुढे दहावीच्या परीक्षेस पात्र होण्यासाठी क्रेडिट्स देण्यात येतील. ज्या आयटीआयच्या अभ्यासक्रमांसाठीची अर्हता दहावी अनुत्तीर्ण आहे त्यांच्या गुणपत्रिकेत बदल करून ते कौशल्य विकासासाठी पात्र असे नमूद करण्यात येईल. जे विद्यार्थी दहावीनंतर आयटीआयचा २ वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करतील ते बारावीच्या परीक्षेस पात्र ठरतील. त्यांना दहावीप्रमाणेच क्रेडिट्स देण्यात येतील. या निर्णयामुळे दहावीची समकक्षता मिळालेला आयटीआयचा विद्यार्थी अकरावीसाठी कोणत्याही शाखेत प्रवेश घेऊ शकेल. तर बारावीची समकक्षता मिळालेला विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेऊ शकेल.
बेस्ट आॅफ फाइव्ह योजनेचाही लाभ
दहावी आणि बारावी दोन्ही परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना जास्तीतजास्त ४ विषयांचे क्रेडिट्स घेता येणार आहेत. विद्यार्थ्यांना आयटीआयमधील कमाल गुणांचे रूपांतर शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाºया परीक्षेसाठी करून घेता येणार आहे. या विद्यार्थ्यांना दहावीच्या बेस्ट आॅफ फाइव्ह योजनेचाही लाभ घेता येईल.
भाषा विषय उत्तीर्ण होणे अनिवार्य
शिक्षण मंडळाच्या नियमांप्रमाणे दहावी व बारावी या दोन्ही परीक्षांसाठी दोन भाषा उत्तीर्ण होणे अनिवार्य असल्याचे यासंदर्भातील परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. तसेच पर्यावरण शास्त्र व ग्रेड विषयांतही उत्तीर्ण होणे गरजेचे आहे.