मुंबईतील दहशतवादी हल्ल्याला ९ वर्षे , कुठे आसू, तर कुठे हसू...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 07:24 AM2017-11-27T07:24:20+5:302017-11-27T07:24:48+5:30
मुंबईवरील सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्याला रविवारी ९ वर्षे पूर्ण झाली़ यानिमित्ताने मुंबईत विविध ठिकाणी श्रद्धांजली कार्यक्रम पार पडले. मात्र, हल्ले झालेल्या ठिकाणी मुक्तपणे विहारणाºया पर्यटक आणि मुंबईकरांची गर्दी पाहता, दहशतवादी हल्ल्याच्या भीतीचा विसर पडल्याचे जाणवत होते.
मुंबई : मुंबईवरील सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्याला रविवारी ९ वर्षे पूर्ण झाली़ यानिमित्ताने मुंबईत विविध ठिकाणी श्रद्धांजली कार्यक्रम पार पडले. मात्र, हल्ले झालेल्या ठिकाणी मुक्तपणे विहारणाºया पर्यटक आणि मुंबईकरांची गर्दी पाहता, दहशतवादी हल्ल्याच्या भीतीचा विसर पडल्याचे जाणवत होते. मात्र, या ठिकाणांवर असलेला पोलीस बंदोबस्त आजही मनात असुरक्षिततेची पाल चुकचुकत असल्याची जाणीव करून देत होता.
कुलाबा येथील बधवार पार्क समुद्र किनाºयावरून मुंबईत शिरलेल्या दहशतवाद्यांनी, ताज हॉटेल, नरिमन हाउस, कॅफे लिओपोल्ड, ओबेरॉय हॉटेल येथे बेछूट गोळीबार करत शेकडो लोकांचा बळी घेतला होता. या सर्वच ठिकाणी रविवारी चोख बंदोबस्त दिसला. कॅफे लिओपोल्ड, ताज पॅलेस, ओबेरॉय या ठिकाणी परदेशी पर्यटकांची वर्दळ सुरू होती. ताज पॅलेस परिसरासह गेट वे आॅफ इंडिया पाहण्यासाठी पर्यटकांनी तोबा गर्दी केली होती. सेल्फीसह फोटो काढण्यात या भागात आलेले पर्यटक मग्न होते. तर दुसरीकडे कोणताही घातपात टाळण्यासाठी ताज पॅलेसच्या चहूबाजूंनी पोलिसांनी वेढा दिला होता.
नरिमन हाउस येथे शिवसेनेतर्फे २६/११च्या हल्ल्यातील मृतांसह शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन
करण्यात आले होते. या हल्ल्यात मृत पावलेल्या शिवसेना उपशाखाप्रमुख हरीश गोहील यांस श्रद्धांजली वाहत, त्यांची आई दमयंती यांस आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला. तर ओबेरॉय हॉटेलबाहेर शहीद पोलिसांच्या तसबिरीला पुष्पांजली अर्पण करून, पोलीस विभागाने मानवंदना दिली.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोलिसांना श्रद्धांजली
मुंबईवर २६/११ चा दहशतवादी हल्ला झालेल्या ठिकाणांपैकी एक असलेल्या मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांना श्रद्धांजली वाहण्यात आली. शहिदांच्या फोटोसमोर रांगोळी काढून त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार वाहण्यात आले. परमार्थ सेवा समितीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, अंधेरी, ठाणे आणि चर्चगेट रेल्वे स्थानकांवर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदात्यांनी रक्तदान करून शहिदांना आणि मृतांना श्रद्धांजली वाहिली. या वेळी २७४ बाटल्या रक्त जमा करण्यात आले.
जाग कधी येणार?
कुलाबा येथील बधवार पार्क किनाºयावरून दहशतवादी कसाबसह इतर दहशतवाद्यांनी मुंबईत प्रवेश मिळवला होता. येथील बाहेरील रस्त्यावर पोलिसांकडून दुचाकीस्वारांची झाडाझडती सुरू होती.
याच किनाºयावर देखरेख ठेवण्यासाठी उभारण्यात आलेल्या मनोºयाशेजारी सीसीटीव्ही लावले असून, त्याच्याच मदतीने पोलीस किनाºयावर देखरेख ठेवतात. हा मनोरा आजही पोलीस आणि सुरक्षा रक्षकांच्या प्रतीक्षेत आहे.
...अशीही आदरांजली!
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळासह मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने, फोर्ट येथील काळाघोडा परिसरात रांगोळी काढून दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना अदरांजली वाहण्यात आली. या वेळी कॉमेडीयन चार्लिन चॅप्लीन यांच्या वेशभूषेतील एका कलाकाराने त्यांच्याच नकला करून मृतांना अभिवादन केले.
दिंडोशीत शहिदांना श्रद्धांजली
२६ /११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद झालेल्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष अजित रावराणे यांनी मालाड (पूर्व) कुरार गाव येथे आदरांजली अर्पण केली.
कुरार गाव येथील शहीद अशोक कामटे चौक, शहीद हेमंत करकरे चौक तसेच शहीद विजय साळसकर चौक येथे
झालेल्या श्रद्धांजली कार्यक्रमात कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदय राजेशिर्के, पोलीस निरीक्षक सोनावणे हे उपस्थित होते.
या श्रद्धांजली वाहण्यासाठी विभागातील पक्षाचे अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष सेहराज मलिक, तालुका युवक अध्यक्ष अजय चौधरी, महिला तालुका अध्यक्ष रश्मी मोरे, चंद्रप्रकाश यादव, इकबाल वोरा विनोद राजेशिर्के, परशुराम क्षीरसागर, तालुका सचिव प्रदीप देशमुख आदी उपस्थित होते.