निवृत्तीचे वय ६० करण्यास कृती समितीचा विरोध, अंगणवाडी कर्मचारी आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 05:37 AM2018-03-03T05:37:51+5:302018-03-03T05:37:51+5:30
अंगणवाडी कर्मचा-यांना सेवाज्येष्ठतेनुसार मानधनवाढ देण्याचा शासकीय निर्णय काढण्यात आला आहे. या मानधनवाढीचा आनंद व्यक्त करतानाच, निवृत्तीचे वय ६५ वरून ६० वर्षे केल्याच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने, २० मार्चला मुंबईत राज्यव्यापी मोर्चाची हाक दिली आहे.
मुंबई : अंगणवाडी कर्मचा-यांना सेवाज्येष्ठतेनुसार मानधनवाढ देण्याचा शासकीय निर्णय काढण्यात आला आहे. या मानधनवाढीचा आनंद व्यक्त करतानाच, निवृत्तीचे वय ६५ वरून ६० वर्षे केल्याच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने, २० मार्चला मुंबईत राज्यव्यापी मोर्चाची हाक दिली आहे.
कृती समितीच्या निमंत्रक शुभा शमीम यांनी सांगितले की, अंगणवाडी कर्मचाºयांनी पुकारलेला संप मागे घेण्यासाठी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेवाज्येष्ठतेनुसार मानधनवाढीचा निर्णय जाहीर केला. मात्र, त्याचे आदेश निघाले नव्हते. अखेर २७ फेब्रुवारीला आझाद मैदानावर धडक मोर्चा काढल्यानंतर, शासनाने सेवाज्येष्ठतेनुसार मानधनवाढीचा निर्णय जाहीर केला. मात्र, सरकारने निवृत्तीचे वय कमी करण्याचा खोडसाळपणा केला. इतकी वर्षे शासनाची इमानेइतबारे सेवा केल्यानंतर, सरकार त्याचा मोबदला देण्यास तयार नाही. त्यामुळे अंगणवाडी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. सरकारच्या या धूर्तपणाला चोख उत्तर देण्यासाठी कृती समितीने संपूर्ण ताकदीने, २० मार्चला राज्यव्यापी मोर्चाची हाक दिली आहे.
दरम्यान, १ एप्रिलपासून आणखी ५ टक्के मानधनवाढ देण्याचा शब्दही मुख्यमंत्र्यांनी पाळलेला नाही. याउलट मानधनवाढ देताना निवृत्ती वय कमी करण्याची कोणतीही चर्चा शासन आणि कृती समितीमध्ये यापूर्वी झाली नव्हती. त्यामुळे शासन आदेशातून हा मुद्दा वगळला जात नाही, तोपर्यंत बेमुदत ठिय्या आंदोलनाच्या स्वरूपात लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार कृती समितीचे निमंत्रक दिलीप उटाणे यांनी व्यक्त केला आहे.
>पंकजा मुंडे यांच्या विरोधात नाराजी!
अंगणवाडी कर्मचाºयांच्या कृती समितीने २७ फेब्रुवारीच्या मोर्चाची नोटीस
१५ दिवस आधीच महिला व बाल विकासमंत्री पंकजा मुंडे यांना दिली होती. मात्र, तरीही मोर्चाच्या दिवशी भेटीसाठी मुंडे यांनी वेळ न देता, कृती समितीच्या शिष्टमंडळाला सचिव विनिता वेद सिंघल यांच्याशी चर्चा करण्यास सांगितले. याबाबत कृती समितीच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
तोडग्यासाठी प्रतीक्षा बैठकीची
सेवासमाप्ती वय पूर्ववत करण्याबाबत व आहाराचे दर वाढविण्यासाठी कृती समितीने मुंडे यांच्या भेटीची मागणी केली आहे. त्यावर सचिवांनी १२ ते १६ मार्चदरम्यान बैठकीचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले आहे. या बैठकीत तोडगा निघणार की, २० मार्चला पुन्हा कृती समितीला बेमुदत ठिय्या आंदोलन करावे लागणार, याकडे हजारो अंगणवाडीतार्इंचे लक्ष लागले आहे.