पीयूष गोयल यांच्या आरोपावर रितेश देशमुखकडून सडेतोड उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 08:39 AM2019-05-14T08:39:00+5:302019-05-14T10:15:17+5:30
केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते पीयूष गोयल यांनी सोमवारी (13 मे) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे. 26/11 ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत त्यांनी विलासराव देशमुखांवर टीका केली.
मुंबई - केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते पीयूष गोयल यांनी सोमवारी (13 मे) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे. 26/11 ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत त्यांनी विलासराव देशमुख यांच्यावर टीका केली आहे. पीयूष गोयल यांच्या या टीकेला विलासराव देशमुख यांचा मुलगा आणि अभिनेता रितेश देशमुख याने सोशल मीडियाच्या माध्यमातून सडेतोड उत्तर दिले आहे.
पीयूष गोयल यांनी सोमवारी पंजाबमधील लुधियानामध्ये काँग्रेसवर टीका केली आहे. टीका करताना त्यांनी 26/11 च्या मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ दिला. 'मी मुंबईकर आहे. तुम्हाला जर मुंबईवरील दहशतवादी हल्ला आठवत असेल तर त्यावेळी राज्यात काँग्रेसचे सरकार होते. तीन दिवस दहशतवादी गोळीबार करत असताना सरकारने काहीच केले नाही. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे घटनास्थळी एका चित्रपट निर्मात्याला घेऊन गेले होते. या निर्मात्याच्या चित्रपटात मुलाला भूमिका मिळावी म्हणून विलासराव धडपडत होते.' असं पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे.
पीयूष गोयल यांनी केलेल्या टीकेला रितेश देशमुखने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक पत्र पोस्ट करत खास शैलीत सडेतोड उत्तर दिले आहे. यामध्ये पीयूष गोयल यांनी केलेले सर्व आरोप खोटे असल्याचं रितेशने म्हटलं आहे. 'मी ताज/ ऑबेरॉय हॉटेलमध्ये वडिलांसोबत गेलो होतो हे खरं आहे. पण चित्रपटात काम मिळावं म्हणून ते प्रयत्न करत होते हे खोटं आहे. माझे वडील मला चित्रपटात काम मिळावं यासाठी कधीही कुठल्याच निर्मात्याशी बोलले नाहीत आणि त्याचा मला अभिमान आहे. मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार तुम्हाला आहे. मात्र जी व्यक्ती तुमच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी जिवंत नाही, तिच्यावर आरोप करणं चुकीचे आहे. सर, तुम्ही थोडा उशीर केलात, सात वर्षांपूर्वी त्यांनी तुम्हाला उत्तर दिलं असतं' असं पत्र लिहित रितेश देशमुखने पीयूष गोयल यांना त्याच्या खास शैलीत सडेतोड उत्तर दिले आहे.
— Riteish Deshmukh (@Riteishd) May 13, 2019