Maratha Reservation: काँग्रेसचे सर्व आमदार राजीनामे देणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 05:19 PM2018-07-30T17:19:26+5:302018-07-30T17:35:04+5:30
काँग्रेस नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट
मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काँग्रेसचे सर्व आमदार राजीनामा देण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आज काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. यामध्ये अनेक आमदारांनी आरक्षणाच्या प्रश्नावर सामूहिक राजीनाम्याचा प्रस्ताव मांडला. मात्र या मुद्यावर काँग्रेस पक्षानं अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचं प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितलं.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर पक्षाच्या आमदारांच्या भावना अतिशय तीव्र असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले. 'पक्षाच्या बैठकीत अनेक आमदारांनी सामूहिक राजीनाम्याचा प्रस्ताव मांडला. तर काहींनी याबद्दल सभागृहात सरकारला जाब विचारायला हवा, अशी भूमिका मांडली. मात्र याबद्दल कोणताही निर्णय झालेला नाही,' असं चव्हाण यांनी सांगितलं. चव्हाण यांनी आज काँग्रेसच्या आमदारांसह राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेतली. राज्यातील परिस्थिती स्फोटक आहे. यामध्ये हस्तक्षेप करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसनं राज्यपालांकडे केली. याबद्दलचं निवेदनदेखील काँग्रेसनं राज्यपालांना दिलं.
मराठा आरक्षणावरुन सध्या राज्यातील वातावरण पेटलं आहे. राज्यपालांनी या परिस्थितीत लक्ष घालावं, अशी मागणी काँग्रेसनं केली. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर काँग्रेस सहकार्य करण्यास तयार असल्याचंही अशोक चव्हाण यांनी राज्यपालांना सांगितलं. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी शिवसेनेवर शरसंधान साधलं. शिवसेनेची अवस्था वरातीमागून घोडे अशी झाली आहे. या मुद्यावर शिवसेना गंभीर असल्यास त्यांनी सरकारमधून बाहेर पडावं, असं चव्हाण म्हणाले.