भारतीय मातीत स्थिरावलेला अमेरिकी पावा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2018 08:36 AM2018-02-24T08:36:23+5:302018-02-24T08:36:23+5:30

आपल्या पावलांनी जिथली माती कधी मळली नाही, की जिथल्या संस्कारांवर आपला पिंड पोसला नाही; अशा देश, संस्कृतीतील संगीताची मोहिनी पडावी आणि त्यासाठी आयुष्य वेचण्याची प्रेरणा उत्पन्न व्हावी, हे जरा आश्चर्यच!

An American-born musician Nash Naubert,the student of maestro pandit Hariprasad Chaurasia | भारतीय मातीत स्थिरावलेला अमेरिकी पावा!

भारतीय मातीत स्थिरावलेला अमेरिकी पावा!

Next

संकेत सातोपे/मुंबई : आपल्या पावलांनी जिथली माती कधी मळली नाही, की जिथल्या संस्कारांवर आपला पिंड पोसला नाही; अशा देश, संस्कृतीतील संगीताची मोहिनी पडावी आणि त्यासाठी आयुष्य वेचण्याची प्रेरणा उत्पन्न व्हावी, हे जरा आश्चर्यच! अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन येथे जन्मलेल्या- वाढलेल्या आणि भारतीय वेणूनादाने मोहित झालेल्या नॅश नॉर्बट हा बासरीवादक हे असेच एक आश्चर्य आहे. पं. हरिप्रसाद चौरसिया यांचा गंडा बांधलेला हा अमेरिकी कलावंत आज देश-विदेशात भारतीय संगीताचा प्रचारकच झाला आहे.

अमेरिकेतील प्रख्यात उद्योगपती दाम्पत्याचे हे अपत्य. घरात हिशोब होते ते केवळ डॉलर्सचे; मात्रा, आवर्तने आणि सुरावटीच्या गणितात ना त्याचे पालक कधी पडले, ना भावंडे. या पठ्ठयाला मात्र जगभरातील संगीत कानात साठविण्याचे उपजत वेड. त्यातूनच त्याने लिबरल आर्ट कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तिथे काही प्रमाणात भारतीय संगीत कानी पडले. पण ‘युरेका’ म्हणावा असा प्रसंग त्याच्या आयुष्यात आला तो, जयपूरमध्ये असताना. विशीत असताना जगभ्रमंतीसाठी अमेरिकेबाहेर पडलेला नॅश १९९९ साली जयपुरात एका हॉटेलात थांबला असताना पं. रवीशंकर यांच्या सतारीचे स्वर त्याच्या कानी पडले आणि तो भारतीय संगीताकडे ओढला गेला, तो कायमचाच! याच दौऱ्यात अहमदाबादेत एका मंदिराबाहेरच्या कलावंताची बासरी त्याने ऐकली आणि त्याला त्याचे जीवनध्येय सापडले.
२००२ साली त्याने बनारस हिंदू विद्यापीठात बासरीवादनाच्या एका वर्षाच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आणि त्याचा भारतीय शास्त्रीय संगीतातील प्रवास सुरू झाला. काही महिन्यांतच त्याने बासरी वादनातील अत्युच्च शिखर असलेल्या पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या मुंबईतील आश्रमात गुरुकुल पद्धतीने शिक्षण सुरू केले. दिवसातील १४ -१४ तास रियाज करून सहा वर्षांत बासरी वादनाची विद्या आत्मसात केली.

गेल्या १० -१२ वर्षांत नॅशने देश-परदेशात भारतीय शास्त्रीय संगीताचे अनेक महोत्सव आपल्या बासरीने गाजविले आहे. मुंबईतील दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्र, कर्नाटक संघापासून ते न्यू यॉर्कमधील छांदायन इंक, टोरोंटोमधील कॅटेलिस्ट आॅर्गनायजेशन आणि न्यू जर्सीतील रिदम इटरनल अ‍ॅकॅडमीपर्यंत शेकडो ठिकाणी त्याच्या बासुरीला श्रोत्यांचे अलोट प्रेम मिळाले. गोव्यात नुकत्याच झालेल्या सुरश्री केसरबाई केरकर महोत्सवातही त्याला आमंत्रित करण्यात आले होते. प. योगेश समसी, रामदास पळसुले, सत्यजीत तळवळकर, मुकुंदराज देव, अदित्य कल्याणपूर, आदी कलावंतांसोबत त्याने मंच गाजविला आहे.
 
‘इंद्रकली’

भारतीय संगीताचा प्रचार करण्यासाठी नॅशने अमेरिका, जपान, युरोपात अनेक कार्यक्रम केले आहेत. त्याने ‘इंद्रकली’ नावाचा स्वत:चा बॅण्डही स्थापन केला आहे. त्यात अनेक कलाकारांना सोबत घेऊन तो विविध सांगितीक प्रयोग करीत असतो. भारतीय संगीत हे नव्या युगाचे संगीत आणि त्यात खूप शिकण्यासारखे आहे, समाधान आहे आणि ते जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले पाहिजे, असे नॅश सांगतो.

पाश्चात्य संगीत कलावंत असलेली भारतीय पत्नी

नॅश अमेरिकी असून भारतीय संगीताकडे ओढला गेला आणि त्याची पत्नी गेसिल नॉर्बट ही मुंबईतील वांद्रे भागातील वाढलेली गोवेकर मुलगी; पण ती पाश्चात संगीत कलावंत आहे. जॅझ संगीत आणि बॅले नृत्य प्रकारात तिने प्राविण्य मिळविले आहे. त्यामुळे हे दाम्पत्य भारतीय आणि पाश्चात्य संगीताचा मिलाफ घडवून आणून फ्यूजनचे विविध प्रयोग सादर करीत असते. तिचेही स्वत:चे नृत्य पथक आहे.

Web Title: An American-born musician Nash Naubert,the student of maestro pandit Hariprasad Chaurasia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.