...आणि सोनम कपूरने दूर केला पोलिसांचा गैरसमज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 01:10 AM2018-12-15T01:10:58+5:302018-12-15T06:58:25+5:30
मुंबई पोलिसांनी सोनम कपूरचा उल्लेख करत एक व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आणि गाडी चालवताना मोबाइल न वापरण्याचा सल्ला तिला दिला.
मुंबई : पोलिसांच्या ट्विटर अकाउंटवरून जनजागृती सुरू असताना, शुक्रवारी मुंबई पोलिसांनी सोनम कपूरचा उल्लेख करत एक व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आणि गाडी चालवताना मोबाइल न वापरण्याचा सल्ला तिला दिला. याच उत्तराला प्रत्युत्तर देत सोनमने मूळ व्हिडीओ शेअर करून पोलिसांचा गैरसमज दूर केला.
पोलिसांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये अभिनेता दलकर सलमान आणि सोनम कपूर एकाच कारमधून प्रवास करत होते. या व्हिडीओमध्ये ड्रायव्हिंग सीटवर बसलेला दलकर सलमान मोबाइल फोन वापरत असल्याचे दिसून येते. या वेळी त्याचे हात गाडीच्या स्टिअरिंग व्हीलवरसुद्धा नव्हते, तर व्हिडीओत मागे सोनमचा आवाज ऐकू येत आहे. त्यामुळे ‘अशा प्रकारचे स्टंट रिअल लाइफमध्ये करू नका,’ असे म्हणत मुंबई पोलिसांनी तो व्हिडीओ रात्री १.०८ वाजता ट्विट केला.
यालाच प्रतिउत्तर देत, रात्री १.५४ ला सोनमने ट्विट केले आणि याचा मूळ व्हिडीओ शेअर केला. आमची गाडी एक ट्रक खेचून नेत होता. आम्ही गाडी चालवत नव्हतो, असे तिने सांगितले. काळजी व्यक्त केल्याबद्दल पोलिसांना धन्यवाद केले. यावर मुंबई पोलिसांनी पुन्हा उत्तर देत, आमच्यासाठी प्रत्येक मुंबईकर हा खास आहे आणि प्रत्येकाची आम्ही तेवढीच काळजी करतो, असे उत्तर दिले.