Andheri Bridge Collapse: रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिले चौकशीचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2018 11:10 AM2018-07-03T11:10:31+5:302018-07-03T11:12:11+5:30
अंधेरी-विलेपार्लेदरम्यान सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास पादचारी पुलाचा भाग कोसळल्याने पश्चिम मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.
नवी दिल्ली- अंधेरी-विलेपार्लेदरम्यान सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास पादचारी पुलाचा भाग कोसळल्याने पश्चिम मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. पूल कोसळल्यानंतर रेल्वे प्रशासनानं याची गंभीर दखल घेतली आहे. तसेच रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वे सुरक्षा आयोगामार्फत चौकशीचे आदेश दिले आहेत. अंधेरीजवळ पुलाचा काही भाग कोसळल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
अधिका-यांना इतर विभागांशी संपर्क ठेवून ढिगारा बाजूला करून स्थिती पूर्ववत करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिली आहे. मुंबईतील रेल्वे प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी रेल्वेमंत्री पीयूष गोयल मध्य आणि पश्चिम रेल्वे अधिका-यांची बैठक बोलावली होती.
Part of Road Over Bridge has fallen on tracks near Andheri Station impacting rail traffic. Directed officials to speed up repair work and rapidly restore traffic in close coordination with other departments. I have also ordered an enquiry by Commissioner of Rail Safety.
— Piyush Goyal (@PiyushGoyal) July 3, 2018
मंगळवारी दुपारी 2 वाजता रेल्वेमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पश्चिम रेल्वे आणि 4 वाजता मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी रेल्वे मंत्री संवाद साधणार होते. मात्र अंधेरी पूल दुर्घटनेमुले पुन्हा रेल्वे मंत्र्यांची बैठक रद्द होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. यापूर्वी रविवारी बोलावलेली बैठक अपरिहार्य कारणामुळे रद्द करण्यात आली होती, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पूल दुर्घटनेमुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
अंधेरी आणि विलेपार्ले दरम्यानचा गोखले पादचारी पूल कोसळल्यानं पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या पुलाचा भाग रेल्वे रुळांवर कोसळल्यानं रेल्वे वाहतूक पूर्णपणे कोलमडली असून ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. अनिश्चित काळासाठी पश्चिम रेल्वेची वाहतूक खंडित झाल्यानं त्याचा मनस्ताप ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना होतोय.
सकाळी 7 वाजून 35 मिनिटांनी अंधेरी रेल्वे स्थानकाजवळील पादचारी पूल कोसळला. या पुलाचा काही भाग रेल्वे रुळांवर कोसळल्यानं पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. याचा फटका हार्बर रेल्वेलादेखील बसला आहे. पूल कोसळल्यानं दोन जण जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून पुलाचा कोसळलेला भाग बाजूला काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र जोरदार पावसामुळे या कामात अडथळे येत आहेत.