आक्रोश..भय.. शोध निवा-याचा!, मोहल्ल्यात शोककळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 05:18 AM2017-09-01T05:18:07+5:302017-09-01T05:26:41+5:30
मंगळवारी धो धो कोसळणाºया पावसाने मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झाले. त्यातच गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास भेंडीबाजार, पाकमोडिया स्ट्रीटवरील म्हाडाची ११७ वर्षे जुनी सहा मजली ब्रिटिशकालीन इमारत पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली.
मंगळवारी धो धो कोसळणाºया पावसाने मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झाले. त्यातच गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास भेंडीबाजार, पाकमोडिया स्ट्रीटवरील म्हाडाची ११७ वर्षे जुनी सहा मजली ब्रिटिशकालीन इमारत पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. काही दिवसांपूर्वी जेथे ईदची तयारी उत्साहात सुरू होती तेथे क्षणार्धात शोककळा पसरली. ढिगाºयाखाली अडकलेल्या आप्तांचा शोध सुरू झाला. मृतांच्या नातेवाइकांच्या आक्रोश, हुंदक्यांनी सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. इमारत धोकादायक होती, पण ती खाली करायला अनेक कुटुंबे तयार नव्हती. जीव मुठीत घेऊन तेथेच राहत होती. अखेर प्रश्न निवाºयाचा होता. जे गेले त्यांच्या दु:खासोबतच आता बचावलेल्या रहिवाशांना चिंता भेडसावत आहे ती हक्काच्या निवाºयाची... !
मुंबई : बोहरी समाजातर्फे शुक्रवारी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात भेंडी बाजार परिसरात बकरी ईद साजरी करण्यात येणार होती. मात्र बहुसंख्य बोहरी समाजाचे रहिवासी असलेल्या हुसैनी इमारतीच्या दुर्घटनेनंतर गुरुवारी येथील बोहरी मोहल्ल्यासह भेंडी बाजार परिसरावर शोककळा पसरली. आजूबाजूच्या इमारतीही सुरक्षेच्या कारणास्तव रिकामी करण्यात आल्याने हक्काचा निवारा तर गेलाच आहे, शिवाय या दु:खद प्रसंगी ईद साजरी करायची कशी, असा प्रश्न आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, कुर्बानीसाठी बकरा आणण्यापासून मिठाई तयार करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू होते. त्याची तयारीही झाली होती. मात्र गुरुवारी काळाने येथील कुटुंबांवर घाला घातल्यानंतर ईदच्या उत्साहाची जागा आक्रोशाने घेतली असून, सर्वांना भय आणि चिंतेने घेरले आहे. दरम्यान, मृतांच्या कुटुंबीयांसोबत जखमींसाठीही विभागातून दुवा मागितली जात आहे.
या दुर्घटनेनंतर स्थानिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. इतकेच नव्हे तर अग्निशमन दल, एनडीआरएफचे जवान,
पोलीस, महापालिका कर्मचारी, स्थानिकांना विविध लोकांकडून चहा, बिस्किटे, पाणी आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली. ईदच्या आदल्याच दिवशी झालेल्या या दुर्घटनेबाबत प्रत्येक जण हळहळ व्यक्त करत होता.
इमारत दुर्घटना चौकशीचा मुख्यमंत्र्यांचा आदेश
हुसैनी ही इमारत कोसळल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहनिर्माण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना चौकशीचा आदेश दिला आहे. या प्रकरणी हलगर्जीपणा करणाºयांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. तसेच या दुर्घटनेतील मृतांच्या निकटवर्तीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत देण्यात येणार असून, जखमींच्या उपचाराचा पूर्ण खर्च राज्य सरकार करणार आहे. हुसैनी इमारत दुर्घटनेनंतर गुरुवारी दिवसभर सुरू असलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच या दुर्घटनेप्रकरणी गृहनिर्माण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना सविस्तर चौकशी करून सर्वसमावेशक अहवाल देण्याचा आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
...आणि दाऊदचा भाऊ इक्बाल उतरला खाली...!
पाकमोडिया स्ट्रीटवर पत्त्याप्रमाणे कोसळलेल्या हुसैनी या सहा मजली इमारतीशेजारीच अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची इमारत आहे. इमारत कोसळली तेव्हा दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरही घरीच होता. त्याच्याही इमारतीलाही हादरा बसला. शेजारची इमारत कोसळली आहे, हे समजल्यानंतर तो आपल्या इमारतीतून खाली उतरला. त्यामुळे सर्वांच्याच नजरा त्याच्यावर खिळल्या. हुसैनी इमारतीत जवळपास ६० ते ६५ लोक अडकले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता त्यानेही बचावकार्यासाठी मदत केली.इक्बाल कासकर याने या दुर्घटनेबाबत माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, ‘मी नुकताच उठलो होतो. त्या वेळी स्फोटाचा जोरदार आवाज आला आणि सगळीकडे धुरळा उठला. आमचीही इमारत व्हायब्रेट झाली. बस्स. एवढंच पाहिलं मी. त्यानंतर धावतच खाली आलो.’
हुसैनी इमारतीत कमी लोक राहत होते. मात्र खाली कामगार जास्त होते, असेही इक्बाल कासकरने सांगितले. तो मदतीसाठी खाली उतररला होता. मात्र दाऊदचा भाऊ खाली उतरल्याच्या माहितीने दक्षिण मुंबईत वेगळीच चर्चा रंगलेली दिसली.
मदतकार्य
१० क्रू व्हॅन, २ रेस्क्यू व्हॅन, १ हाउस कोलहॅप्स व्हॅन,
१ कमांड पोस्ट, १ जलद प्रतिसाद पथक, १ जेटी, १२५ अग्निशमन दलाचे कर्मचारी, ६ जेसीबी, ७ डंपर्स, १ खासगी पोकलेन, १५० कामगार, ५ - १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका, २ ईएमएस
म्हाडा, महापालिकेने जबाबदारी झटकली
मुंबई : भेंडीबाजार येथे कोसळलेल्या हुसैनी या इमारतीला २०११-१२ सालीच ‘धोकादायक’ म्हणून घोषित करण्यात आले होते; आणि ही इमारत पाडण्यासाठीची परवानगी २७ जुलै २०१६ रोजीच सैफी बुºहाणी अपलिफमेंट ट्रस्टला देण्यात आली होती, अशी सारवासारव करत म्हाडा प्राधिकरणाने हात वर केले आहेत. दुसरीकडे महापालिकेनेही या घटनेची जबाबदारी ‘म्हाडा’ची असल्याचे म्हणत हात झटकण्याचा प्रयत्न केला आहे. दोन्ही प्राधिकरणांनी हात झटकल्याने जबाबदारी नक्की कोणाची, असे प्रश्नचिन्ह कायम आहे.
पीडितांचा वाली कोण?
म्हाडाने २०११-१२ साली ही इमारत ‘धोकायदायक’ घोषित केली होती. सैफी बुºहाणी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये ही इमारत होती. ११७ वर्षे जुन्या हुसैनी इमारतीत १३ भाडेकरू, १२ निवासी आणि एका व्यापारी गाळ्याचा समावेश होता. २०१३-१४ साली ७ कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले होते. दरम्यान, इमारत कोसळल्यानंतर जबाबदारी कोणतेच प्राधिकरण घेत नसल्याने अशा दुर्घटनांतील पीडितांचा वाली कोण, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
बचावकार्य वेगाने सुरू
8.30ें AM भेंडीबाजार, मौलाना शौकत अली रोड, बोरी मोहल्ला येथे असलेली हुसैनी इमारत ही तळमजला अधिक ५ व पार्ट ६ असे बांधकाम असलेली इमारत कोसळल्याची माहिती अग्निशमन नियंत्रण कक्षास मिळाली.
8.31ें AM अग्निशमन दलामार्फत आपत्कालीन व्यवस्थापन विभागास माहिती देण्यात आली.
8.31ें AM अग्निशमन
दलाने गाड्या घटनास्थळी
रवाना केल्या.
8.38ें AM अग्निशमन दलाच्या ३ गाड्या, २ फायर इंजीन व १ अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाल्या.
8.45ें AM राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाला कार्यान्वित करण्यात आले.
9.45ें AM राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाचे
९० जवानांचे पथक घटनास्थळी पोहोचले.
राज्यपालांनी व्यक्त केले दु:ख
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी हुसैनी इमारत दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. मृतांच्या आप्तेष्टांच्या दु:खात मी सहभागी आहे. तसेच जखमी झालेले लोक लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
बुलेट ट्रेनपेक्षा लोकांचा जीव वाचवा
- खा. अशोक चव्हाण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
महानगरपालिका, म्हाडा अधिकारी यांच्या भ्रष्ट संगनमतामुळे आणि सरकारच्या दुर्लक्षामुळे मुंबईत इमारती कोसळण्याच्या दुर्घटना घडत आहेत. यामध्ये किड्या-मुंग्यांप्रमाणे माणसे मरत आहेत. पण सरकारला लोकांच्या जीविताबाबत संवेदना राहिली नाही. बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्गापेक्षा लोकांचा जीव वाचविणे महत्त्वाचे आहे.
म्हाडा जबाबदार
- धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते विधान परिषद
हुसैनी इमारत कोसळण्याची दुर्घटना दुर्दैवी असून या घटनेस म्हाडाच जबाबदार आहे. धोकादायक इमारतींंचा २५ वर्षं पुनर्विकास होत नसल्याने भाडेकरू जागा सोडत नाहीत. निश्चित काळात पुनर्विकास करण्याचे धोरण ठरले पाहिजे. शासनाने स्वत:च्या ड्रीम प्रोजेक्टपेक्षा धोकादायक इमारतीच्या पुनर्विकासाकडे आणि नागरिकांच्या जीवाकडे लक्ष द्यावे.