Atal Bihari Vajpayee : मराठी साहित्य संमेलनात जेव्हा वाजपेयी पोहोचले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 03:05 AM2018-08-17T03:05:57+5:302018-08-17T03:39:07+5:30

मुंबईत १९८६ साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन किंग जॉर्ज हायस्कूलमध्ये (आताची राजे शिवाजी स्कूल) भरले होते. प्रख्यात कादंबरीकार विश्राम बेडेकर संमेलनाध्यक्ष होते.

Atal Bihari Vajpayee : When Vajpayee arrives at the Marathi Sahitya Sammelan | Atal Bihari Vajpayee : मराठी साहित्य संमेलनात जेव्हा वाजपेयी पोहोचले

Atal Bihari Vajpayee : मराठी साहित्य संमेलनात जेव्हा वाजपेयी पोहोचले

googlenewsNext

मुंबईत १९८६ साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन किंग जॉर्ज हायस्कूलमध्ये (आताची राजे शिवाजी स्कूल) भरले होते. प्रख्यात कादंबरीकार विश्राम बेडेकर संमेलनाध्यक्ष होते. उद्घाटनाच्या दिवशी वाजपेयी मुंबई दौऱ्यावर होते. दादर रेल्वे स्थानकावर ते उतरले. गाडीतून जाताना त्यांना साहित्य संमेलनाचा बोर्ड दिसला, त्यांनी लगेच वेदप्रकाश गोयल यांच्याकडून माहिती घेतली आणि सायंकाळी संमेलनाच्या उद्घाटनाला जाण्याची इच्छा व्यक्त केली.
गोयल यांनी सुधीर नांदगावकर यांना निरोप दिला. सायंकाळी अटलजी संमेलनस्थळी पोहोचले. तेथे नांदगावकर उभे होतेच. ‘मै संमेलन में आ सकता हूँ ना,’ असा प्रश्न त्यांनी केला. संपूर्ण अध्यक्षीय होईपर्यंत वाजपेयी संमेलनात बसून होते. स्वत: एक संवेदनशील हिंदी कवी असलेल्या वाजपेयींनी मराठीबद्दल असा जिव्हाळा व्यक्त केला.
अटलजी आणि गोळवलकर
यांच्यातील ‘तो’ संवाद
रा. स्व. संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी आणि त्या वेळपर्यंत जनसंघाचे मोठे नेते झालेले अटलबिहारी वाजपेयी हे एकाच रेल्वेगाडीने प्रवास करीत होते. मात्र, ते दोघे वेगवेगळ्या डब्यात होते व त्यांना आपण सहप्रवासी असल्याची कल्पना नव्हती. दोघेही इंदूरला पोहोचले. तेव्हा रेल्वे स्थानकावर वाजपेयींच्या स्वागताला हजारो कार्यकर्ते जमले होते. गोळवलकर गाडीतून उतरले आणि घ्यायला आलेल्या दोन स्वयंसेवकांसोबत ज्यांच्याकडे मुक्काम होता त्यांच्या घरी रवाना झाले पण इकडे वाजपेयींची कार्यकर्त्यांनी मिरवणूकच काढली. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन गुरुजी अडकले.
विशेष म्हणजे ज्यांच्याकडे गुरुजी मुक्कामी होते त्यांच्याचकडे वाजपेयी मुक्कामी होते. वाजपेयी येऊन पोहोचले व थोड्या वेळाने गुरुजीही आले. राजकारण्यांच्या लोकप्रियतेमुळे मला जरा उशीर झाला, असे गुरुजी मिश्कीलभावाने म्हणाले खरे; पण संवेदनशील मनाचे वाजपेयी यांनी क्षणात आपल्या गळ्यातील दुपट्टा गुरुजींच्या पायावर ठेवला. ‘आपल्या आदेशाने मी जनसंघात गेलोय, आत्ता आदेश करा, पुन्हा संघात परतीन, असे ते म्हणाले. गुरुजी त्यावर त्यांना म्हणाले, तुम्ही स्वत: किती मिश्कील आहात, खुसखुशीत व समयसूचक विनोदांनी इतरांना हसविता, मग माझा विनोद कळला नाही का? आणि त्या ठिकाणी एकच हशा पिकला. त्यात दोघेही सहभागी झाले.
शब्दांकन - यदु जोशी

अटलजी, ग्वाल्हेरची निवडणूक
अन् जातीपातीचा विचार
१९८४ च्या लोकसभा निवडणुकीत वाजपेयी विरुद्ध काँग्रेसचे दिग्गज नेते माधवराव शिंदे असा सामना ग्वाल्हेरमध्ये झाला. त्या वेळी मराठा समाजाच्या स्थानिक संस्थांनी शिंदे यांना पाठिंबा देणारे पत्रक काढले. वाजपेयी हे कान्यकुब्ज ब्राह्मण. त्या समाजाचे लोक लगेच वाजपेयींकडे आले. तुम्हाला पाठिंबा देणारे पत्रक आम्ही काढतो. समाजातर्फे तुमचा सत्कार करतो,’ असा प्रस्ताव त्यांनी वाजपेयींना दिला. वाजपेयींनी तत्काळ उत्तर दिले, हे बघा! मी संघ स्वयंसेवक आहे. विशिष्ट जातीच्या पाठिंब्यावर राजकारण करण्याचा माझा संस्कार नाही. मी पराभूत झालो तरी चालेल पण मी तत्त्वांशी कधीही तडजोड करणार नाही.

हम इलेक्शन हारे है, हिंमत नही हारे है...
भाजपाच्या निर्मितीनंतर पक्षाचे पहिले अधिवेशन मुंबईत भरले. वाजपेयी अध्यक्ष होते. शिवाजी पार्कवरील सभेत हजारो कार्यकर्त्यांमध्ये जोश भरताना भाषणाच्या अंतिम टप्प्यात त्यांनी म्हटलेले ते वाक्य आजही पक्षाचे अनेक नेते भाषणांतून वापरतात. ते वाक्य होते, ‘पश्चिम सागर के तट पर खडा रह कर मै यह भविष्यवाणी करता हूँ की, अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा और कमल खिलेगा’. अटलजींची ती भविष्यवाणी खरी ठरली ती १९९६मध्ये त्यांच्याच नेतृत्वात केंद्रात सरकार आले तेव्हा. मात्र, त्याच्या फार आधी १९८४च्या निवडणुकीत भाजपाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. केवळ दोन खासदार निवडून आले. पक्षात प्रचंड नैराश्य पसरले. त्या पराभवानंतर मुंबई भाजपाने वडाळा भागात घेतलेल्या मेळाव्यात मार्गदर्शन करायला वाजपेयी आले. तेव्हाचे त्यांचे वाक्य आजही अनेकांच्या मनात घर करून आहे. ते म्हणाले होते, ‘हम इलेक्शन हारे है, हिंमत नही हारे है. हमे और झुंझना होगा. सत्ता हथियाने का कभी कोई शॉर्टकट नही होता.’ अशा प्रेरणादायी वाक्यांसाठी अटलजी कायम स्मरणात राहतील.
 

Web Title: Atal Bihari Vajpayee : When Vajpayee arrives at the Marathi Sahitya Sammelan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.