बेस्टच्या संपामुळे मुंबईकरांची दैना!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 02:20 AM2019-01-09T02:20:57+5:302019-01-09T02:21:35+5:30
मेट्रोचा पर्याय, चाकरमान्यांचे हाल : टॅक्सी, रिक्षाचालकांची काही ठिकाणी मुजोरी
मुंबई : बेस्ट कामगारांनी पुकारलेल्या संपाचा मोठा फटका शहरातील नागरिकांना बसला. शहरात असलेल्या प्रमुख शासकीय कार्यालयांकडे जाणाऱ्या कर्मचाºयांसह चाकरमान्यांची मोठी गैरसोय झाल्याचे चित्र मंगळवारी दिसले. महत्त्वाची बाब म्हणजे, शहरात आलेल्या बहुतांश प्रवाशांना संपाची कल्पनाच नसल्याने त्यांची बरीच तारांबळ उडाल्याचे दिसले.
उपनगराप्रमाणे, शहरात मेट्रो किंवा मोनोचा दिलासा नसल्याने नागरिकांना एकट्या टॅक्सी सेवेचा पर्याय उपलब्ध होता. परिणामी, भाडे नाकारणे दूरच रिकामी टॅक्सी मिळणेही नागरिकांसाठी आव्हानात्मक ठरले. परिणामी, बस स्टॉपवर उभे असलेल्या बहुतेक नागरिकांनी एकत्रित प्रवास करण्याची शक्कल लढविली. दुचाकीस्वारांकडे लिफ्ट मागून काहींनी प्रवास पूर्ण केला. विशेषत: भायखळ्याहून नागपाडा, आग्रीपाडा व मुंबई सेंट्रल गाठण्यासाठी नागरिकांना अडचणी आल्या. अशाचप्रकारे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला उतरेलल्या प्रवाशांना चिरा बझार, मंत्रालय, नरिमन पॉइंट, गेट वे आॅफ इंडिया अशा वेगवेगळ्या कामाच्या व पर्यटनस्थळांवर जाताना टॅक्सी मिळत नव्हती. परिणामी, तरुणांनी पायपीट करतच इच्छीत स्थळ गाठण्याचा प्रयत्न केला. याउलट एरव्ही पाच मिनिटांत टॅक्सी मिळणाºया येथील स्टँडवर प्रवाशी अर्धा तास टॅक्सीसाठी रांग लावून उभे होते.
पश्चिम उपनगरातील वांद्रे, मजास, गोरेगाव, ओशिवरा, मालाड, पोयसर, मागाठणे, दहिसर या विविध बस आगारांतून एकही बस निघाली नाही. बेस्ट संपामुळे प्रवाशांचे, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे हाल झाले. दिंडोशी आयटी पार्क ते गोरेगाव स्टेशन पूर्व येथे जाण्यासाठी व येण्यासाठी नागरिकांसाठी खासगी बसेस, शेअर रिक्षाची व्यवस्था करण्यात आली होती. रिक्षा मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्या होत्या. संपाचा फायदा अनेक रिक्षा चालक मनमानी करून घेत होते, तर ओला व उबेरचा व्यवसाय जोरात होता. अंधेरी रेल्वे स्थानक ते वर्सोवा या सहा किमीच्या अंतरासाठी रिक्षात पाच माणसे भरली जात होती. प्रतिमाणसी तीस रुपये आकारले जात होते. बेस्ट संपामुळे वर्सोवा ते घाटकोपर मेट्रोने प्रवास करणे प्रवाशांनी पसंद केले.
टॅक्सीवाल्यांची चांदी
सोमवारी मध्यरात्रीपासून बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी बेस्ट बंदचा संप पुकारल्याने मंगळवारी यांचे पडसाद पाहायला मिळाले. रोज बेस्टने प्रवास करणाºया प्रवाशांचे हाल झाले. मंगळवारी भायखळा, सीएसएमटी येथील बेस्टच्या थांब्याजवळ टॅक्सीवाल्यांनी गाड्या उभ्या करून प्रवासी भरू लागले. मनाला वाटेल तितके दर टॅक्सीवाल्यांकडून आकारण्यात आले. बेस्टचा संप असल्याने मुंबई शहरातील आगारातून एकही गाडी निघाली नाही. त्यामुळे बेस्ट कर्मचाºयांच्या संपाला शंभर टक्के पाठिंबा मिळाला असल्याचे दिसून आले. नेहमीची बस पकडून इच्छितस्थळी जाणाºया मुंबईकराना संपामुळे बसच्या ठिकाणी टॅक्सी आल्याने जादा भाडे देऊन टॅक्सीने प्रवास करावा लागला. टॅक्सीचालक प्रवाशांकडून दुप्पट-तिप्पट दर वसूल करत होते. भायखळा ते जे. जे. पुलावर या एक ते दीड किमी अंतरासाठी तब्बल ८० ते १०० रुपये दर आकारत होते. इतर वाहनेदेखील जादा वसुली करत होते. जवळच्या अंतरासाठी प्रवाशांनी पायी किंवा कोणाकडून लिफ्ट घेऊन प्रवास केला.
मेट्रोचा प्रवाशांना आधार
अंधेरी गाठता यावी, म्हणून प्रवाशांनी घाटकोपरहून मेट्रोचा आधार घेतला. ज्यांना हे शक्य नव्हते, त्यांनी कुर्ल्याहून साकीनाक्यापर्यंत रिक्षा आणि तेथून पुढे मेट्रोचा आधार घेतला. कमानीहून सांताक्रुझ आणि वांद्रे स्थानकाकडे जाण्यासाठी प्रवाशांनी शेअर रिक्षा करत आपला प्रवास पूर्ण केला. कमानीहून सायन गाठण्यासाठी प्रवाशांनी शेअर टॅक्सीचा आधार घेतला. बेस्टची सेवा पूर्णत: बंद असल्याने रिक्षा आणि टॅक्सीवर अतिरिक्त ताण पडला होता.
मुंबईकरांना एसटीचा दिलासा
च्बेस्ट कर्मचारी कृती समितीने पुकारलेल्या बेमुदत संपामुळे मुंबईत मंगळवारी एकही बेस्ट बस धावली नाही. त्यामुळे त्रासलेल्या मुंबईकरांना सुरक्षित प्रवास देण्यासाठी एसटी प्रशासनाने पुढाकार घेत, सुरुवातीला ४० एसटी बस सोडल्या होत्या. बेस्टच्या संपामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून गरजेनुसार त्यात वाढ करत एसटी प्रशासनाच्या एकूण ५५ बस मंगळवारी रस्त्यावर धावल्याचे प्रशासनाने सांगितले.
च्मुंबईतील प्रमुख रेल्वे स्थानकांबाहेर एसटीने जादा गाड्या सोडल्या होत्या. त्यात कुर्ला, दादर, पनवेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ठाणे यांचा समावेश होता. कुर्ला पश्चिम ते वांद्रे, कुर्ला पूर्व ते चेंबूर, दादर ते मंत्रालय, पनवेल ते मंत्रालय या मार्गांवर एसटीच्या प्रत्येक पाच बसेस धावल्या. पनवेल ते दादर मार्गावर एसटीने १० गाड्या सोडल्या होत्या.
च् छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून कुलाबा आणि मंत्रालयापर्यंत जाणाऱ्या प्रवाशांसाठी एसटीने प्रत्येकी पाच-पाच बसेसची व्यवस्था केली होती. याउलट ठाण्याहून मोठ्या संख्येने मंत्रालयाकडे जाणाºया प्रवाशांसाठी एसटीने एकूण १५ गाड्यांची तरतूद केली. अशाप्रकारे एसटीच्या एकूण ५५ बसेस दिवसभर मुंबईकरांच्या सेवेसाठी धावत होत्या. सायंकाळी ६ वाजेपर्यंत या ५५ बसेसद्वारे एकूण १२३ फेºया पूर्ण केल्याचे प्रशासनाने सांगितले.
पूर्व उपनगरातील बसला फटका
च्बेस्ट कर्मचाºयांच्या संपाचा मंगळवारी सर्वसामान्य मुंबईकरांना मोठा फटका बसला. घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडुप परिसरातदेखील बेस्टच्या संपाचा परिणाम रस्त्यावर दिसून येत होता. बस सेवा उपलब्ध नसल्याने प्रवासी मोठ्या प्रमाणात रिक्षा व टँक्सीकडे वळले. त्यामुळे या वाहनचालकांना मंगळवारी मोठी मागणी असल्याचे चित्र होते.
च्बेस्टने प्रवास करणाºया प्रवाशांना बेस्टचा पर्याय नसल्याने रिक्षा, टॅक्सीकडे नेहमीपेक्षा जास्त प्रवासी आल्याने, अनेक ठिकाणी चालकांनी जवळचे भाडे नाकारले व केवळ लांबचे भाडे स्वीकारण्यास प्राधान्य दिले. त्यातच काही चालक प्रवाशांकडून नेहमीपेक्षा जास्त रक्कम आकारत असल्याचेदेखील चित्र होते. बेस्टच्या संपामुळे रिक्षा व टॅक्सी चालकांची वर्दळ नेहमीपेक्षा वाढली होती. काही नागरिकांना बेस्टच्या संपाबाबत माहिती नसल्याने हे नागरिक बेस्ट बसची प्रतीक्षा करत होते. त्यांना काही वेळानंतर बेस्टचा संप सुरू असल्याचे कळाल्यावर त्यांनी खासगी वाहनांकडे आपला मोर्चा वळविला. मुंबई विद्यापीठाच्या विधि विभागासह अनेक अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांनाही महाविद्यालयात पोहोचण्यासाठी अनेक कसरती कराव्या लागल्या. त्यामुळे या विद्यार्थ्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत होती.