BEST Strike : कामावर चला, अन्यथा खोल्या रिकाम्या करा; बेस्ट कर्मचाऱ्यांना 'मेस्मा'अंतर्गत नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 03:13 PM2019-01-09T15:13:02+5:302019-01-09T15:19:05+5:30
BEST Strike : बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप चिघळला आहे. बेस्ट प्रशासनाकडून संपकरी कर्मचाऱ्यांविरोधात मेस्मा अंतर्गत कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. कामगारांना संपातून माघार घेण्यास भाग पाडण्यासाठी बेस्ट प्रशासनाने त्यांना बेस्ट वसाहतीतील घर खाली करण्याची नोटीस पाठवण्यास सुरूवात केली आहे.
मुंबई - बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप चिघळला आहे. बेस्ट प्रशासनाकडून संपकरी कर्मचाऱ्यांविरोधात मेस्मा अंतर्गत कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. कामगारांना संपातून माघार घेण्यास भाग पाडण्यासाठी बेस्ट प्रशासनाने त्यांना बेस्ट वसाहतीतील घर खाली करण्याची नोटीस पाठवण्यास सुरूवात केली आहे. भोईवाडा वसाहतीमध्ये कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.
'काम करायचं नसेल तर वसाहतीतील खोल्या रिकाम्या करा',असा आदेश बेस्ट प्रशासनाने संपकरी कर्मचाऱ्यांना दिला आहे.
बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अनधिकृत असल्याचा निर्णय औद्योगिक न्यायालयानं दिला. तसंच संप करू नये, असे आवाहनही बेस्ट उपक्रमाने केले होते. त्यानंतरही संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाई सुरू असल्याचे बेस्ट प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
Mumbai: Strike by Brihanmumbai Electricity Supply&Transport(BEST) bus employees over their demands including fixation at master grade of employees employed after 2007,merging BEST budget with ‘A’ budget of BMC & resolving the issue of employee service residences, continues today. pic.twitter.com/P7FWVUXsjJ
— ANI (@ANI) January 9, 2019
काय आहेत मागण्या?
सुधारित वेतन करार
दिवाळीचा बाेनस
कामगारांच्या निवासस्थानाचा प्रश्न साेडविणे
बेस्टचे महापालिकेत विलीनीकरण
दरम्यान, बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी (9 जानेवारी) मध्यरात्रीपासून संपाचं हत्यार उपसत सर्वसामान्यांना वेठीस धरले आहे. महापालिका आणि बेस्ट प्रशासनाबरोबर मंगळवारी (8 जानेवारी) कामगार संघटनांच्या सर्व बैठका निष्फळ ठरल्यामुळे संपचिघळला आहे. संपामुळे कोंडीत सापडलेल्या शिवसेनेने बेस्टकर्मचाऱ्यांना दिलेला नैतिक पाठिंबा काढून घेतला. यामुळे संपात फूट पडल्याची जोरदार चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. अखेर बेस्ट संपाबाबतच्या नामुष्कीवर कबुली देत यामध्ये फूट पडल्याचं शिवसेनेकडून मान्य करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे हे प्रकरणात आता 'मातोश्री'कडे पोहोचले आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः लक्ष घालणार आहेत. उद्धव ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्यावरुन आल्यानंतर उद्धव ठाकरे बैठक घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
कोट्यवधींचा महसूल बुडाला
सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या संपामुळे मंगळवारी एकही बस रस्त्यावर न आल्यानं बेस्ट उपक्रमाला तीन कोटी रुपयांचे नुकसान झाले. मुंबईच्या रस्त्यांवर दररोज 2,800 बस धावतात आणि त्यातून बेस्ट उपक्रमाला तीन कोटी रुपयांचा महसूल दररोज मिळत असतो. आगामी आर्थिक वर्षात बेस्ट उपक्रमानं 690 कोटी रुपयांची तूट दाखवली आहे. तर दोन हजार कोटी रुपयांची संचित तूट आहे.