अजून भाजपाने शिवसेनेला युतीसाठी प्रस्तावही दिलेला नाही; दानवेंचं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 01:37 PM2019-01-03T13:37:44+5:302019-01-03T13:47:11+5:30
शिवसेनेला अद्याप युतीबाबतचा प्रस्ताव दिलेला नाही, प्रस्ताव देऊन लवकरच बोलणी सुरू होईल.
मुंबई - भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजपा-सेना युतीबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केलं. तसेच युतीसंदर्भातील निर्णयाला कुठलीही कालमर्यादा नसते, गेल्यावेळेस 2 दिवस अगोदर आमची युती तुटली. त्यामुळे अद्याप केवळ चर्चा सुरू आहे, पण कुठलाही प्रस्ताव भाजपाकडून शिवसेनेला देण्यात आला नाही, असे स्पष्टीकरण दानवे यांनी दिले आहे. त्यामुळे युतीचा घोळ अद्यापही तळ्यात-मळ्यात असाच सुरू आहे.
शिवसेना भाजपा युतीचं कोडं अद्याप उलगडलं नाही. कारण, शिवसेनेनं यंदा अजिबात युती होणार नसल्याचं जाहीर केलं आहे. तर, याबाबत भाजपा प्रचंड आशावादी दिसून येते. त्यामुळे युती होणार का, या प्रश्नाच उत्तर सध्यातरी अनुत्तरीतच आहे. त्यातच, भाजपाने 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला असून स्वबळाची तयारी केल्याचं समजते. शिवसेनेला युतीबाबतचा अद्याप प्रस्ताव दिलेला नाही, प्रस्ताव देऊन लवकरच बोलणी सुरू होईल, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे. समविचारी पक्षांनी एकत्र येऊन मतविभाजन टाळले पाहिजे, असे म्हणत दानवेंनी युतीचे संकेत दिले आहेत. दरम्यान, अमित शाह यांच्याकडून तयारीला लागण्याच्या सूचनाही मिळाल्याचे दानवेंनी सांगितले.
दरम्यान, भाजपा-सेना युतीवरुन राष्ट्रवादीने भाजपाला टोला लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि समविचारी पक्षांच्या आघाडीची चिंता तुम्ही करू नका, आधी तुमचा सहकारी पक्ष शिवसेना तुमच्या सोबत रहाते की नाही ते बघा, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावला. मंत्री पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला वेगवेगळे लढण्याचे आव्हान दिले होते.