भाजपा-शिवसेनेच्या लव्हस्टोरीने रिपाइं कार्यकर्त्यांमध्ये नाराजी!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 05:12 PM2019-03-29T17:12:13+5:302019-03-29T17:12:57+5:30

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा सूत जमल्याने जागा वाटपात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाइं) ला एकही जागा न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.

BJP-Shiv Sena's Lovestory angry with the RPI activists! | भाजपा-शिवसेनेच्या लव्हस्टोरीने रिपाइं कार्यकर्त्यांमध्ये नाराजी!

भाजपा-शिवसेनेच्या लव्हस्टोरीने रिपाइं कार्यकर्त्यांमध्ये नाराजी!

googlenewsNext

- योगेश बिडवई
मुंबई : गेली साडेचार वर्षे एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या भाजपा-शिवसेनेचे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा सूत जमल्याने जागा वाटपात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाइं) ला एकही जागा न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी रिपाइं (आठवले) ने मुंबईतील एक आणि शिर्डी अथवा सोलापूरची जागा भाजप-शिवसेनेकडे मागितली होती. मात्र, आठवले यांना राज्यसभेवर पुन्हा संधी दिली जाईल, या आश्वासनावर त्यांची बोळवण करण्यात आली. पहिल्यांदाच रिपाइं लोकसभा निवडणुकीच्या रिंगणाबाहेर आहे आणि पक्ष म्हणून अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी ही बाब चांगली नाही, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. सेना-भाजपाने आमच्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखून त्यांना प्रचारात सहभागी करून घ्यावे, अशी अपेक्षा रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.

नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे बुधवारी नाशिक व दिंडोरी मतदारसंघासाठी महायुतीचा मेळावा झाला. मात्र बॅनरवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे छायाचित्र नसल्याने रिपाइंचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्यासह जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी बहिष्कार घातला. शिवाय, नाशिक येथे झालेल्या बैठकीतही ते सहभागी झाले नाहीत.

कल्याण येथे झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात रिपाइंचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब रोकडे यांनी सेना-भाजपाच्या मंत्र्यांसमोरच जाहीर नाराजी व्यक्त केली. रिपाइंमुळे महायुतीची राज्यात सत्ता आली. तुम्ही आमदार, मंत्री झालात. मात्र रिपाइंच्या कार्यकर्त्यांना एखाद्या कमिटीवरही घेतले नाही. भाजपाला आमची गरज नसेल, तर विरोधात काम करून ताकद दाखवून देऊ, असा इशारा रिपाइंचे रामनाथ शेजवळ यांनी दिला.

रिपाइंचा प्रभाव असलेले लोकसभा मतदारसंघ
दक्षिण मध्य मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, नागपूर, कल्याण

-----------
आमचे नेते रामदास आठवले यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्र्यंनी सकारात्मक भूमिका घेतली. त्यानंतरच आम्ही कोल्हापुरच्या सभेत सहभागी झालो. कार्यकर्त्यांच्या तक्रारी असतील, तर त्यांनी जाहीरपणे न मांडता वरिष्ठ पातळीवर आमच्याकडे मांडाव्यात. त्यांचे म्हणणे रास्त आहे. त्यावर मार्ग काढू.
- अविनाश महातेकर, राज्य अध्यक्ष, रिपाइं (आठवले गट)

Web Title: BJP-Shiv Sena's Lovestory angry with the RPI activists!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.