परीक्षा शुल्कवाढीचा निर्णय घेणार अधिष्ठाता मंडळ, अॅकॅडमिक कौन्सिलची बैठक : महत्त्वाचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 02:59 AM2017-10-12T02:59:13+5:302017-10-12T02:59:28+5:30
मुंबई विद्यापीठाचा निकालाचा गोंधळ सुरू असतानाच विद्यापीठाशी संलग्नित असणाºया महाविद्यालयांनी परीक्षा शुल्क वाढवले होते. त्यामुळे विद्यार्थी अधिक त्रस्त झाले होते.
मुंबई : मुंबई विद्यापीठाचा निकालाचा गोंधळ सुरू असतानाच विद्यापीठाशी संलग्नित असणाºया महाविद्यालयांनी परीक्षा शुल्क वाढवले होते. त्यामुळे विद्यार्थी अधिक त्रस्त झाले होते. पण, परीक्षा शुल्क वाढीसंदर्भात अधिष्ठाता मंडळ पुनर्विचार करणार असल्याचे विद्यापीठाने बुधवारी जाहीर केले. अॅकॅडमिक कौन्सिलमध्ये हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याने लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार असल्याची चिन्हे आहेत.
पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आली. पदवी परीक्षांचे शुल्क ६००वरून हजार करण्यात आले होते. त्यामुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे परीक्षा शुल्क हे १ हजार २०० ते १ हजार ५००पर्यंत वाढले होते. त्यामुळे विद्यार्थी त्रस्त झाले होते. या कारणाने बुधवारी या विषयावर सविस्तर चर्चा झाली. परीक्षा शुल्क वाढीवर निर्णय घेण्याची जबाबदारी अधिष्ठाता मंडळावर टाकली आहे. बुधवारी अॅकॅडमिक कौन्सिलच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. यासंदर्भात अहवाल प्राप्त झाल्यानंतर या वाढीव शुल्काबाबत अंतिम निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने जाहीर केली आहे. शुल्कवाढ गरजेची आहे का? ती कोणत्या आधारे करण्यात आली आहे? यांसारख्या अनेक मुद्द्यांवर हा अहवाल तयार केला जाणार आहे.
मुंबई विद्यापीठाने परीक्षा विभागाने यंदापासून आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचा निर्णय घेतला. या निर्णयाची घोषणा जुलैमध्ये केली. तरी महाविद्यालयांना पूर्वकल्पना न देता त्याची अंमलबजावणी अचानकपणे सुरू केली. तर काही महाविद्यालयांत मार्चमध्ये झालेल्या परीक्षांसाठी वाढीव शुल्क आकारले गेले होते. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला होता.