जस्ट डायलवरून कार चोरी
By admin | Published: December 3, 2014 02:37 AM2014-12-03T02:37:31+5:302014-12-03T02:37:31+5:30
जस्ट डायल या हेल्पलाइनवर भाड्याने वाहन हवे असल्याचे सांगून नियोजित ठिकाणी कार बोलवायची
नवी मुंबई : जस्ट डायल या हेल्पलाइनवर भाड्याने वाहन हवे असल्याचे सांगून नियोजित ठिकाणी कार बोलवायची. त्यानंतर अज्ञात ठिकाणी गेल्यानंतर चालकाला मारहाण करून कार पळवून नेणा-या टोळीला रबाळे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली.वाहनचोरी प्रकरणी या टोळीतील सात जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ३ इनोव्हा, १ स्विफ्ट व १ झायलो अशी चोरीची पाच वाहने जप्त केली आहेत. हे सर्व जण वसई, नालासोपारा परिसरातले राहणारे आहेत.
काही दिवसांपूर्वी चालकाला मारहाण करून इनोव्हा कार चोरल्याची घटना घडली होती. त्याशिवाय वाशी पोलीस ठाणे हद्दीतही एक स्विफ्ट कार चोरीला गेली होती. या वाहनचोरी प्रकरणांचा छडा लावण्याकरिता उपआयुक्त शहाजी उमाप, सहाय्यक आयुक्त अरुण वालतुरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथके तयार करण्यात आली होती. त्यानुसार रबाळे एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने एका टोळीला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक बाबासाहेब तुपे, सहाय्यक निरीक्षक राहुल खताळ, उपनिरीक्षक प्रदीप सरफरे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी वासिम शेख (२४) याला ताब्यात घेतले. तसेच त्याच्या इतर सहकाऱ्यांची नावे देखील सांगितली. त्यानुसार एकूण सात जणांना अटक केल्याचे उपआयुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले.
वासिम शेख (२४), शरद घावे (२२), आदित्य पवार (२२), महेंद्र सहाणी (२२), रामदास मुळे (३२), सिध्देश शेलार (३१), गौतम चोडणकर (३८) अशी त्यांची नावे आहेत. वासिम हा या प्रकरणातला मुख्य सूत्रधार असून चोरलेली वाहने तो रामदास याच्याकडे विक्रीसाठी द्यायचा. त्यानुसार रामदास हा चोरीची वाहने खरेदी करण्यास तयार असलेल्या ग्राहकांना अवघ्या एक ते दीड लाखात ही वाहने विकायचा. वासिम व त्याचे मित्र वसईमध्ये एका गॅरेजच्या ठिकाणी बसलेले असायचे.
त्यांच्यावर वाशी, रबाळे, नारपोली, दहिसर पोलीस ठाण्यात दरोडा व जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.ही टोळी पकडणाऱ्या पथकाला १५ हजारांचे पारितोषिक देऊन गौरवले.(प्रतिनिधी)