‘स्टॉलमुक्त’ स्थानकांसाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून पाहाणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 02:04 AM2018-04-17T02:04:11+5:302018-04-17T02:04:11+5:30
मुंबई उपनगरीय स्थानकांवरील वाढत्या गर्दीच्या नियोजनासाठी मध्य रेल्वेने स्थानके स्टॉलमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी मध्य रेल्वेतर्फे स्थानकांची पाहणी सुरू आहे.
मुंबई : मुंबई उपनगरीय स्थानकांवरील वाढत्या गर्दीच्या नियोजनासाठी मध्य रेल्वेने स्थानके स्टॉलमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी मध्य रेल्वेतर्फे स्थानकांची पाहणी सुरू आहे. स्थानक पाहणीत प्रवासी सुविधांचा आढावा घेत प्रवाशांना अधिकाकधिक सुविधा देण्यात येतील.
एल्फिन्स्टन दुघर्टनेनंतर स्थानकावरील गर्दी नियंत्रणासाठी स्थानकातील खाद्यपदार्थांचे स्टॉल हटविण्याबाबत चर्चेने वेग घेतला. त्यासाठी मध्य रेल्वेतर्फे स्थानकांची पाहणी सुरू आहे. पाहणीअंती या स्थानकांची क्षमता, स्थानक फलाटांवरील वर्दळ लक्षात घेत संबंधित स्टॉल हटविण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली. प्रवासी वर्दळ जास्त असलेली स्थानके निश्चित करत, खाद्यपदार्थांचे स्टॉल त्वरीत हटविण्यात येणार आहेत, तसेच स्थानकातील खाद्यपदार्थ विक्री स्टॉलची परवाने नूतनीकरण प्रक्रियाही थांबविण्यात येणार आहे.
सद्यस्थितीत मध्य रेल्वेवर १७ पादचारी पुलांचे काम पूर्ण झाले असून, २२ पादचारी पुलांचे काम सुरू आहे, तसेच होम फलाट असलेल्या स्थानकासह बहुतांशी स्थानकात सरकते जिने आणि लिफ्ट बसविण्याचे काम सुरू असल्याचे मध्य रेल्वे सांगितले.
प्रवाशांना विश्रांतीसाठी फलाटावर नवीन आसने बसविण्यात येणार आहे. हा खर्च संबंधित स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निधीचा वापर करण्यात येणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.