पात्रता तपासणी न केलेल्या कोकण मंडळांच्या विजेत्यांना पुन्हा संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2018 06:34 AM2018-09-09T06:34:03+5:302018-09-09T06:34:13+5:30
म्हाडाच्या कोकण मंडळाकडून मागच्या महिन्यात काढण्यात आलेल्या लॉटरीतील ज्या विजेत्यांनी म्हाडाकडे अजूनपर्यंत कागदपत्रे जमा केलेली नाहीत, अशा विजेत्यांना म्हाडाने आणखी एक संधी दिली आहे.
मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाकडून मागच्या महिन्यात काढण्यात आलेल्या लॉटरीतील ज्या विजेत्यांनी म्हाडाकडे अजूनपर्यंत कागदपत्रे जमा केलेली नाहीत, अशा विजेत्यांना म्हाडाने आणखी एक संधी दिली आहे. हे अर्जदार १० सप्टेंबरपासून म्हाडात जाऊन राहिलेली कागदपत्रे सादर करू शकतील.
कोकण मंडळातर्फे २५ आॅगस्टला वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात ९,०१८ सदनिकांसाठी संगणकीय सोडत झाली. यातील यशस्वी अर्जदारांसाठी तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरात दहा दिवसांत सुमारे २,३०० यशस्वी अर्जदारांच्या कागदपत्रांची तपासणी झाली, तर १,३०७ अर्जदारांना तात्पुरते देकार पत्र मिळाले.
शिबिरात जे अर्जदार उपस्थित राहू शकले नाहीत, त्यांच्यासाठी १० सप्टेंबरपासून म्हाडा मुख्यालयातील कोकण मंडळाच्या पणन कक्षात पात्रता तपासणी शिबिर होईल. रोज ५० यशस्वी अर्जदारांची पात्रता तपासणी होईल. म्हाडाच्या मित्र कक्षामधील कोकण मंडळाच्या संबंधित कर्मचाऱ्यांकडे अर्जदारांसाठी टोकन उपलब्ध आहे. सोडतीतील उर्वरित संकेत क्रमांकांमधील अर्जदारांच्या पात्रता निश्चितीसाठी दुसºया टप्प्यातील शिबिर लवकरच आयोजित करू, अशी माहिती कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी विजय लहाने यांनी दिली. फक्त ३ टक्के प्रकरणातील अर्जदारच अपात्र ठरले. त्यांना अपात्रतेची कारणे थेट तेथेच पटवून दिल्याने एकही अपील दाखल झाले नसल्याचेही लहाने यांनी सांगितले.