स्थानक परिसरातील वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
By admin | Published: February 24, 2015 10:41 PM2015-02-24T22:41:52+5:302015-02-24T22:41:52+5:30
शास्त्रीनगर, विशालनगर, सावरकर नगर व वसई रोड रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेस असलेल्या परीसराचा समावेश या प्रभागात आहे.
वसई : शास्त्रीनगर, विशालनगर, सावरकर नगर व वसई रोड रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेस असलेल्या परीसराचा समावेश या प्रभागात आहे. त्यातील विकासकामांवर गेल्या साडेचार वर्षात ६.५० कोटी खर्च झालेत. त्यातून पेव्हरब्लॉक बसवणे, रस्त्याची दुरूस्ती इ. कामे झाली. नगरपरिषदेच्या माध्यमातून अनेक कामे मार्गी लागल्यामुळे प्रलंबित विकासकामांचा प्रश्नच उपस्थित होत नाही असा दावा या प्रभागाचे नगरसेवक भरत (धनंजय) गुप्ता यांच्याकडून करण्यात येतो.
नगरसेवक, नगराध्यक्ष, प्रभाग समिती सभापती व आता परिवहन सेवा प्रमुख अशा विविध पदावर काम करणारे गुप्ता यांनी आपल्या सत्ताकारणाच्या वाटचालीमध्ये विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लावले परंतु इतर प्रभागाप्रमाणे त्यांच्या प्रभागातही तीव्र पाणीटंचाई जाणवते. वाढती लोकसंख्या हे जरी कारण असले तरी वितरण व्यवस्थेमधील गोंधळही त्यास काही अंशी कारणीभूत आहे. वाहतूक कोंडीचाही महत्वाचा प्रश्न सुटू शकलेला नाही. रेल्वे स्थानक परीसरातील वाहतूक कोंडीमुळे नागरीक त्रस्त आहे. वाहतूक पोलिसांचे गल्लाभरू धोरण त्यास कारणीभूत आहे. वसई रोड पश्चिमेस एक दिशामार्ग करण्याचा निर्णय १० वर्षापूर्वी नगरपरिषद प्रशासन, वाहतुक पोलीस व स्थानिक पोलिसांनी एकत्र येऊन घेतला होता. परंतु त्या निर्णयाची अंमलबजावणी आजवर कधीच झाली नाही. त्यामुळे सकाळी व संध्याकाळी या भागातून ये-जा करणे नागरीकांना शक्य होत नाही. एका बाजूला अनधिकृत रिक्षातळ, दुसरीकडे स्कॉयवॉक व वाहतूक पोलीसांच्या आशिर्वादाने एकदिशा मार्गाची झालेली दुर्दशा अशा कारणामुळे नागरीकांना दररोज तारेवरची कसरत करावी लागते.