काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार लवकरच शिवसेनेत ? उद्धव ठाकरेंशी अर्धा तास चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 02:42 PM2019-06-26T14:42:08+5:302019-06-26T15:46:10+5:30
सिल्लोड येथील काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन तब्बल अर्धा तास चर्चा केली.
मुंबई - काँग्रेसचे बंडखोर नेते अब्दुल सत्तार यांच्या राजकीय भवितव्याबाबत मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यात खलबते होत आहेत. अब्दुल सत्तार यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. सत्तार यांच्या भाजप प्रवेशाला स्थानिक कार्यकर्त्यांचा विरोध आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडूनच सत्तार यांचे शिवसेनेत राजकीय पुनर्वसन करण्यात येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
सिल्लोड येथील काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन तब्बल अर्धा तास चर्चा केली. त्यामुळे सत्तार यांचा लवकरच शिवसेनाप्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. आगामी तीन महिन्यात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजणार आहेत. त्यामुळे, पक्षबदली आणि संधी लक्षात घेऊन राजकीय नेत्यांकडून वरीष्ठ नेत्यांच्या गाठीभेटींना जोर आला आहे. ''मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची सदिच्छा भेट घेतली. आगामी काळात निवडणुका आहेत, त्यामुळे सदिच्छा भेट घेणं आवश्यक आहे. उद्धव ठाकरेंशी सविस्तर राजकीय चर्चा झाली. मात्र, नंतर जो निर्णय होईल तो तुम्हाला कळवण्यात येईल,'' असे अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे.
अब्दुल सत्तार यांना उद्धवजींची वेळ हवी होती. मुख्यमंत्री आणि उद्धवजींचे बोलणे झाले आहे. आणि आता आमची शिवसेना भाजप-युती आहे. सत्तार यांनी उद्धवजींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याप्रमाणे ही भेट होती, असे शिवसेनेचे उपनेते विश्वनाथ नेरुरकर यांनी म्हटले आहे. आता परिस्थिती अशी आहे की भाजपचे अधिकृत 122 आमदार आहेत. युती झाल्यास सद्य परिस्थितीनुसार 144 जागा भाजपकडे गेलेल्या आहेत. त्यामध्ये अनेक काँग्रेसमधून आलेल्या नेत्यांचा समावेश आहे.
सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार नको असा पवित्रा भाजप कार्यकर्त्यांनी घेतलाय असं मी वर्तमान पत्रात वाचले. आता, या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव साहेब आणि मुख्यमंत्र्यांचे बोलणे झाले असावे. शिवसेना पक्षप्रमुखाना भेटणं हे सूचक असू शकेल. त्यांचा पक्षप्रवेश होऊ शकतो, काहीही होऊ शकतं. पण, उद्धव साहेब आणि अब्दुल सत्तार यांचे नेमके काय बोलणे झालं हे मला माहित नाही. कारण मी बैठकीवेळी आत नव्हतो. दोघांचे वन टू वन बोलणे झाले. पण, ज्या घडामोडी घडत आहेत ज्या आपल्या सर्वांना ठाऊक आहेत, त्या पार्श्वभूमीवरच ही भेट असावी, असेही नेरुरकर यांनी म्हटले आहे.