काँग्रेसचे स्वतःच्या परिवारापुरतेचे राजकारण धोकादायक: पीयूष गोयल
By सीमा महांगडे | Published: May 9, 2024 05:52 PM2024-05-09T17:52:37+5:302024-05-09T17:57:30+5:30
पीयूष गोयल यांच्या प्रचारार्थ गुरुवारी सकाळी मालाड पश्चिम येथे मुव्ही टाइम सिनेमापासून नमो यात्रा काढण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे केवळ आपल्या परिवारापुरते असलेले राजकारण देशासाठी धोकादायक असल्याची जोरदार टीका उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार पीयूष गोयल यांनी केली. वर्णद्वेष करीत फूट पाडण्याच्या रणनीतीद्वारे देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांनी काँग्रेसचा निषेधही केला.
पीयूष गोयल यांच्या प्रचारार्थ गुरुवारी सकाळी मालाड पश्चिम येथे मुव्ही टाइम सिनेमापासून नमो यात्रा काढण्यात आली. यावेळी मतदारांशी संवाद साधताना त्यांनी काँग्रेसच्या संकुचित धोरणावर टीका करत पंतप्रधानासाठी संपूर्ण देश हा त्यांचा परिवार असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकारने घेतलेल्या लोकोपयोगी निर्णयांची माहितीही पीयूष गोयल यांनी दिली. कोविड संसर्गाच्या कालावधीत त्यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय ऑक्सिजन उत्पादनात प्रतिदिन ९०० मेट्रिक टनवरून ९,००० मेट्रिक टन अशी लक्षणीय वाढ करण्यात आल्याने लाखो रुग्णांना दिलासा मिळाल्याचे पीयूष गोयल यांनी यावेळी नमूद केले. उत्तर मुंबईला उत्तम मुंबई म्हणून परिवर्तीत करणार असल्याची ग्वाही त्यांनी प्रचारसभेत दिली.
या प्रचार फेरीत हजारो भाजपा कार्यकर्त्यांसह बाळासाहेब ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष, मनसे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असे महायुतीच्या घटक पक्षातील कार्यकर्तेही सहभागी झाले होते.