काँग्रेसचे एक प्रदेश कार्याध्यक्ष लवकरच भाजपमध्ये येतील, चंद्रकांत पाटील यांचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 04:48 AM2019-07-18T04:48:57+5:302019-07-18T04:49:15+5:30
काँग्रेसच्या पाच कार्याध्यक्षांपैकी एक लवकरच भाजपमध्ये आल्यास आश्चर्य वाटू देऊ नका, असा गौप्यस्फोट भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी केला.
मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसमुक्त करणे हे आपले एकमेव लक्ष्य असून काँग्रेसच्या पाच कार्याध्यक्षांपैकी एक लवकरच भाजपमध्ये आल्यास आश्चर्य वाटू देऊ नका, असा गौप्यस्फोट भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी केला.
भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रकांत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची सुत्रे स्वीकारली. संघटनेमध्ये काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या चंद्रकांत दादा भाजपला यशोशिखराकडे नेतील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. कामगार मंत्री डॉ. संजय कुटे, मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा आदी यावेळी उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर आता आपण मंत्रिपद सोडणार का, या पत्रकारांच्या प्रश्नात पाटील म्हणाले, त्याबाबतचा निर्णय पक्षाचे केंद्रीय नेतृत्व करेल. मी नेहमीच पक्षाच्या आदेशाचे पालन करीत आलो आहे. मी कोऱ्या पाकिटासारखा आहे. पाकिटाचा मालक त्यावर जो पत्ता लिहेल त्यानुसार पाकिटाला जावे लागत असते.
देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष होते आणि नंतर मुख्यमंत्री झाले. आपणही आता मुख्यमंत्री होणार का, यावर ते म्हणाले की प्रदेशाध्यक्षांनी मुख्यमंत्री झाले पाहिजे असे जरूरी नसते. आगामी विधानसभा निवडणूक फडणवीस यांच्या नेतृत्वातच भाजप लढेल. विधानसभा निवडणुकीला भाजप- शिवसेना आणि इतर पक्षांची महायुती एकत्रितपणे सामोरे जाईल, याचा त्यांनी पुनरुच्चार केला. लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या पराभवासाठी चंद्रकांत पाटील यांनी कंबर कसली होती. तेथे घरदेखील भाड्याने घेतले होते. आता प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर बारामतीत विधानसभेला राष्ट्रवादीला पराभूत करण्यासाठी आपण तेथे राहणार का, असे विचारले असता ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीत तेथे राष्ट्रवादीला पराभूत करणे हे दिवास्वप्न आहे. आमचे लक्ष्य हे २०२४ ची लोकसभा निवडणूक असून तेव्हा बारामतीत आम्ही नक्कीच जिंकू.
>पीक विम्यापोटी १५ हजार कोटींची भरपाई
शिवसेनेने आज पीक विम्यासंदर्भात काढलेल्या मोर्चाबाबत प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, शिवसेनेने सरकारविरुद्ध मोर्चा काढलेला नाही. विमा कंपन्यांविरुद्ध काढला आहे. जेथे अन्याय होतो असे वाटते तेथे भाजपच्या कार्यकर्त्यांनीही मोर्चे निदर्शने करायला हवीत. गेल्या साडेचार वर्षांत राज्यातील शेतकऱ्यांनी २३०० कोटी रुपयांचा विमा हप्ता भरला आणि त्यांना तब्बल पंधरा हजार कोटी रुपयांची भरपाई मिळाली.