उपनगरीय रूग्णालयांत सीटी स्कॅन व एमआरआय सुविधा

By admin | Published: April 18, 2017 05:22 AM2017-04-18T05:22:16+5:302017-04-18T05:22:16+5:30

मुंबई महापालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांमध्ये ‘सार्वजनिक खासगी भागीदारी’ तत्त्वावर दोन ठिकाणी सी. टी. स्कॅन सुविधा केंद्र व एका ठिकाणी एम. आर. आय

CT scan and MRI facility in suburban hospitals | उपनगरीय रूग्णालयांत सीटी स्कॅन व एमआरआय सुविधा

उपनगरीय रूग्णालयांत सीटी स्कॅन व एमआरआय सुविधा

Next


मुंबई : मुंबई महापालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांमध्ये ‘सार्वजनिक खासगी भागीदारी’ तत्त्वावर दोन ठिकाणी सी. टी. स्कॅन सुविधा केंद्र व एका ठिकाणी एम. आर. आय. सुविधा केंद्र उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या अंतर्गत संबंधित क्षेत्रातील अनुभव असणाऱ्या स्वयंसेवी संस्था, कंपन्या वा व्यवसायिक आस्थापना इत्यादींकडून मध्यवर्ती खरेदी खात्याद्वारे निविदा मागवण्यात आल्या आहेत. यानुसार महापालिकेद्वारे उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या तीन ठिकाणी संबंधित यंत्रसामुग्री बसविणे, आवश्यक त्या मनुष्यबळाची नेमणूक करणे आणि गरजूंना गुणवत्तापूर्ण सुविधा वेळेत उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
महापालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांमध्ये असणारा रुग्णसंख्येचा ओघ लक्षात घेता सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर आता आणखी दोन ठिकाणी सी. टी. स्कॅन सुविधा, तर एका रुग्णालयात एम.आर.आय. सुविधा देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या अंतर्गत कुर्ला परिसरातील खान बहादूर भाभा रुग्णालय व गोवंडी परिसरातील पंडीत मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालय, या दोन्ही रुग्णालयांमध्ये निविदा आमंत्रित करण्यात आल्या आहेत. तर घाटकोपर परिसरातील राजावाडी रुग्णालयात एम. आर. आय. सुविधा केंद्र उभारण्यासाठी देखील संबंधित क्षेत्रातील अनुभव असणाऱ्या स्वयंसेवी संस्था, कंपन्या, व्यवसायिक आस्थापना इत्यादींकडून निविदा मागवण्यात आल्या आहेत.
यशस्वी निविदाकारास महापालिकेच्या तिनही रुग्णालयांमध्ये वर्षाला १ रुपया या भाडेपट्टा दराने साधारणपणे १ हजार चौरस फूटांची जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या जागेत आवश्यक ती यंत्रसामुग्री बसविणे, तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध करुन घेणे यासह गरजू रुग्णांना महापालिकेच्याच दरात सी. टी. स्कॅन व एम. आर. आय. सुविधा उपलब्ध करुन देणे बंधनकारक असणार आहे. महापालिकेच्या रुग्णालयतील जागा १० वर्षाकरिता सबंधित अटी व शर्तींच्या आधारे राहून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. दर ५ वर्षांनी कार्यतपासणी आधारे संबंधित कराराचे नूतणीकरण करण्यात येणार आहे. या निविदा प्रक्रियेत संबंधित संस्था वा कंपन्या यांना सहभागी होण्याची शेवटची तारीख २४ एप्रिल आहे, अशी माहिती पालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांचे प्रमुख वैद्यकीय अधीक्षक (प्र.) डॉ. प्रदीप जाधव यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: CT scan and MRI facility in suburban hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.