पीएफचे ४.७१ कोटी कापले, खिशात टाकले! विचारे कुरिअर्सच्या मालकावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 10:20 AM2023-12-19T10:20:40+5:302023-12-19T10:21:18+5:30
भविष्य निर्वाहनिधीची फसवणूक केल्याप्रकरणी चारकोप पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई : शहरातील लोकप्रिय कुरिअर आणि लॉजिस्टिक सेवा पुरवठादार विचारे कुरिअर्सच्या मालकावर ४.७१ कोटी रुपयांच्या भविष्य निर्वाहनिधीची फसवणूक केल्याप्रकरणी चारकोप पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कंपनीच्या संस्थापक आणि संचालकांनी कर्मचाऱ्यांच्या पगारातून पैसे कापले पण, भविष्य निर्वाह निधी कार्यालयात जमा केले नाहीत, असा आरोप भविष्य निर्वाह निधी निरीक्षक स्नेहा कुलकर्णी (५३) यांनी केला आहे. विचारे एक्स्प्रेस अँड लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक महेंद्र विनायक विचारे, चंद्रकांत वसंत विचारे आणि अविनाश शिर्के यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली.
पैसे स्वतःसाठी वापरले :
विचारे एक्स्प्रेस आणि लॉजिस्टिक प्रायव्हेट कंपनीचे चारकोप, कांदिवली येथे कार्यालय आहे.
विचारे एक्स्प्रेस अँड लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेडच्या तीन संस्थापक आणि संचालकांनी कर्मचाऱ्यांच्या पगारातून नोव्हेंबर २०२०-२२ दरम्यान भविष्य निर्वाह निधीसाठी ४.७१ कोटी रुपये कापले.
मात्र ते त्यांनी पीएफ कार्यालयात जमा केले नाहीत. त्यांनी हे पैसे काढून घेत स्वतःच्या नफ्यासाठी वापरले.