दाऊद इब्राहिमचा साथीदार फारुख टकलाच्या पासपोर्टचं यूपीएच्या काळात नूतनीकरण?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2018 10:43 AM2018-03-09T10:43:24+5:302018-03-09T11:55:08+5:30
फारुख टकलाच्या पासपोर्टचं यूपीएच्या काळात नूतनीकरण करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे.
मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा साथीदार फारुख टकला याला 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेप्रकरणी सीबीआयनं गुरुवारी (8 मार्च) दिल्ली विमानतळावर अटक केली. दरम्यान, फारुख टकलाच्या पासपोर्टचं यूपीएच्या काळात नूतनीकरण करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. एबीपी माझानं यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
फारुख टकलाच्या पासपोर्टचं यूपीएच्या काळात 2011 मध्ये नूतनीकरण करण्यात आलं. त्यावेळी एस एम कृष्णा परराष्ट्र मंत्री होते, तर पी चिदंबरम केंद्रीय गृहमंत्री होते. दरम्यान, टकलाविरोधात 1995 साली इंटरपोलनं रेडकॉर्नर नोटीस बजावली होती, त्यानतंर 2011 साली टकल्याच्या पासपोर्टची मुदत संपली. टकलानं दुबईतून पासपोर्ट नूतनीकरणासाठी त्यानं 7 फेब्रुवारी 2011 ला अर्ज केला आणि लगेच दुसऱ्या दिवशी त्याच्या पोसपोर्टचं नूतनीकरण करण्यात आलं. त्यामुळे एखाद्या प्रमुख आरोपीच्या पासपोर्टचं नूतनीकरण होऊ कसं शकतं? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
Dawood Ibrahim's aide Farooq Takla who was brought to Mumbai after being deported from Dubai, produced before TADA court pic.twitter.com/AbI27rIkPe
— ANI (@ANI) March 8, 2018
दिल्ली विमानतळावरुन केली अटक
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा साथीदार फारुख टकला याला १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेप्रकरणी सीबीआयने गुरुवारी पहाटे दिल्ली विमानतळावर अटक केली. तो दुबईहून परतत होता. त्याला न्यायालयाने १९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. संयुक्त अरब अमिरातने (यूएई) फारुखला भारताच्या हवाली केल्याचे समजते. यासिन मन्सूर मोहम्मद फारुख उर्फ फारुख टकला याला बॉम्बस्फोटांनंतर २५ वर्षांनी दिल्लीत अटक करण्यात आली. त्या बॉम्बस्फोटांत २५७ जण ठार व सुमारे ८२ कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. त्यानंतर दाऊद व त्याचे साथीदार दुबईला पळून गेले व नंतर त्यांनी पाकिस्तानचा आश्रय घेतला. फारुख टकलाही दुबईला पळाला होता. त्याला पकडण्यासाठी इंटरपोलने १९९५ साली रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. फारुख टकला दाऊदचा दुबईमधील कारभार सांभाळत होता.
फारुख टकला गुरुवारी पहाटे ५.१५ वाजण्याच्या सुमारास दुबईतून दिल्ली विमानतळावर उतरताच त्याला अटक करण्यात आली. तेथून त्याला सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या टाडा कोर्टात हजर करण्यात आले. अतिरिक्त प्रधान न्यायाधीश गो. आ. सानप यांच्या खंडपीठासमोर त्याला हजर केले. सीबीआयचे वकील अॅड. दीपक साळवी यांनी न्यायालयात सांगितले की, टकलाने बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम बिस्मिल्लाह खान उर्फ सलीम कुर्ला आणि त्याच्या चार साथीदारांना दुबईत शस्त्रांचे प्रशिक्षण दिले. तेथून त्यांना दहशतवादी कारवायांसाठी कराचीमध्ये पोहोचविण्याची व्यवस्था केली. या व्यतिरिक्त टकलाचा यामध्ये आणखीन कसा सहभाग होता, त्याच्या चौकशीतून या तपासाला वेगळी दिशा मिळू शकते म्हणून त्यांनी न्यायालयाकडे १४ दिवसांची कोठडीची मागणी केली होती. मात्र, टकलाच्या वकिलाने सीबीआय कोठडीची गरज नसल्याचे सांगितले. या प्रकरणात आरोपपत्र दाखल झाले आहे. दोषींपैकी काहींना शिक्षाही झाली आहे. तसेच टकला याच्या सहभागाची माहितीही तपासात स्पष्ट झाल्यामुळे वाढीव कोठडीची आवश्यकता नसल्याचे सांगितले. मात्र, न्यायालयाने त्याला १९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
बॉम्बस्फोट मालिकेनंतर टायगर मेमनसह अन्य आरोपी दुबईत पसार झाले होते. फारुख मधल्या काळात दाऊद टोळी विशेषत: छोटा शकीलच्या संपर्कात होता, अशी माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे. त्यामुळे त्याच्या अटकेने बॉम्बस्फोटातील फरार आरोपींसोबत दाऊद, शकीलच्या दुबई, पाकिस्तानातील हालचालींबाबत ठोस माहिती हाती लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे, त्या दिशेने तपास यंत्रणा काम करत आहेत.
दोन भावांचा फिल्मी ड्रामा
गुरुवारी संध्याकाळी ६.४५च्या सुमारास टकला याला न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी त्याचा जुळा भाऊ अहमद फारुख तेथेच तळ ठोकून होता. बॉम्बस्फोट मालिकेनंतर मुंबई पोलीस व सीबीआयने दोघांचाही शोध सुरू केला होता. यामध्ये मुंबईत असलेला अहमद याला अटक केली, तर फारुख टकला पसार झाला. पुढे अहमद लंगडा या खटल्यातून सुटला. टकला न्यायालयात येताच अहमदने त्याची गळाभेट घेतली. दोघांनाही रडू कोसळले, तसेच सुनावणी दरम्यानही त्याने मध्येच टकलाला काही तरी सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा न्यायाधीशाने त्याला दम भरला. त्यानंतर ‘गलती हो गयी’ म्हणून तो खाली बसला. त्यानंतर सीबीआयने न्यायालयाला अहमदच्या मदतीनेच फारुखपर्यंत पोहोचू शकल्याचे सांगितल्यावर अहमदला चक्कर आली व तो खाली कोसळला.
टकलाच्या सहा अर्जांपैकी एक अर्ज मंजूर
टकलाच्या वकिलाने न्यायाधीशांकडे विविध मागणीचे सहा अर्ज न्यायालयात केले. त्यापैकी वकिलासोबत १० मिनिटे बोलू देण्याचा एक अर्ज मान्य करण्यात आला. ७.१५च्या सुमारास सुनावणी संपल्यानंतर त्याला, पोलीस अधिकाºयांसमोर वकिलासोबत दहा मिनिटे बोलू देण्यात आले. तर अन्य पाच अर्जांवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.
थेट संबंध
बॉम्बस्फोटांआधी काही आरोपींना फारुक टकला व त्याचा भाऊ मोहम्मद अहमद मन्सूर दुबईला घेऊन गेले होते. नंतर या आरोपींना पाकिस्तानमध्ये शस्त्रास्त्रे व स्फोटकांचे प्रशिक्षण दिले गेले. बॉम्बस्फोटांसाठी आरडीएक्स उतरविण्यातही फारुक टकला होता.