विजय चव्हाण यांच्या निधनाने गिरणी कामगारांत हळहळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 02:20 AM2018-08-25T02:20:05+5:302018-08-25T02:20:28+5:30

कला विभागात केले होते काम; कामगारांनी दिला आठवणींना उजाळा

The death of Vijay Chavan in the mill workers grieved | विजय चव्हाण यांच्या निधनाने गिरणी कामगारांत हळहळ

विजय चव्हाण यांच्या निधनाने गिरणी कामगारांत हळहळ

Next

मुंबई : गिरणी कामगार कलावंत म्हणून आपल्या उत्कृष्ट विनोदी भूमिकेने मराठी नाट्य व चित्रपटसृष्टीवर ठसा उमटविणारे अभिनेते विजय चव्हाण यांच्या निधनाने गिरणी कामगारांनीही शुक्रवारी शोक व्यक्त केला. मफतलाल मिलमध्ये काम करताना कामगार रंगभूमीद्वारे सिनेसृष्टीत अल्पावधीतच विजय चव्हाण यांनी आपला ठसा उमटवला होता. त्यांच्या निधनाने कलाविश्वाची हानी झाल्याची प्रतिक्रिया राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी व्यक्त केली.
अहिर म्हणाले, राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने देण्यात येणाऱ्या गं. द. आंबेकर जीवनगौरव पुरस्काराने विजय चव्हाण यांना २०१३ साली गौरविण्यात आले होते. तो संघाचा पहिलाच पुरस्कार सोहळा होता. चव्हाण यांच्या प्रेरणेतून अनेक गिरणी कामगारांना नाट्यक्षेत्रात काम करण्याची प्रेरणा मिळाली. त्यामुळे त्यांच्या जाण्याने गिरणी कामगारांवरही शोककळा पसरली आहे. संघटनेच्या कला विभागात ते प्रारंभीच्या काळात कार्यरत होते. म्हणूनच त्यांच्या जाण्याने गिरणी कामगार वर्गावरही शोककळा पसरली आहे.
संघटनेचे सरचिटणीस गोविंद मोहिते म्हणाले, गं. द. आंबेकर जीवन गौरव पुरस्काराने झालेला सन्मान आजवर मिळालेल्या पुरस्कारांपेक्षा थोर आणि घरचा असल्याचे आत्मिक उद्गार चव्हाण यांनी पुरस्कार स्वीकारताना काढले होते. त्यांचे पाय नेहमीच जमिनीवर होते. आपण प्रथम गिरणी कामगार कलावंत आहोत, याचा ते आवर्जून उल्लेख करीत असत. कामगार रंगभूमीवर ‘मोरूची मावशी’, ‘पोलीस तपास चालू आहे’, ‘किचकवध’, ‘हयवदन’ अशा अनेक नाटकांत त्यांनी काम करून आपल्या कुशल अभिनयाची चमक दाखवली होती. एक यशस्वी आणि गुणी कलावंत म्हणून रसिकांच्या मनात त्यांचे स्मरण कायम राहील, असेही मोहिते यांनी शोक व्यक्त करताना म्हटले.

सोशल मीडियावर ‘मामां’च्या निधनाने हळहळ
‘मोरूची मावशी’ या नाटकातील मावशीच्या भूमिकेतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांनी शोक व्यक्त केला. अचूक टायमिंग साधून विनोद करणे, पात्राला न्याय देणे हे कौशल्य त्यांच्यात होते. याच कौशल्याला हेरून सोशल मीडियावरून मेसेज व्हायरल होत होते.
व्हॉटस्अ‍ॅप स्टेटस्वर विजय चव्हाण यांचे फोटो अपलोड करून श्रद्धांजली वाहिली जात होती. फेसबुकवरून ‘मोरूची मावशी’ या नाटकातील ‘टांग टिंग टिंगा’ या गाण्याचा भाग मोठ्या प्रमाणावर पोस्ट आणि शेअर केला जात होता. प्रत्येकाच्या स्टेटस्वर टांग टिंग टिंगा गाणे वाजत होते.
या सर्व माध्यमातून नेटकºयांनी चव्हाण यांना श्रद्धांजली वाहिली. कला क्षेत्रातील व्यक्तीचे लाडके मामा हरपल्याने कला क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करत होते. सामाजिक क्षेत्रातील, राजकीय नेते यांच्या वतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली. टिष्ट्वटरवरून #विजय चव्हाण #आरआयपी #मोरूची मावशी असे हॅशटॅग वापरून मेसेज फॉरवर्ड केले जात होते.
मोरूची मावशी या नाटकाची आठवण प्रत्येक युजर्सना होत होती. त्यामुळे या नाटकाचे पोस्टरदेखील पोस्ट केले जात होते. तसेच ‘श्रीमंत दामोदर पंत’, ‘टूरटूर’, ‘हयवदन’ यांसारख्या नाटकांतून त्यांनी कसदार अभिनय सादर केल्याची आठवण युजर्सकडून काढण्यात आली. ‘झपाटलेला’, ‘पछाडलेला’, ‘भरत आला परत’, ‘जत्रा’, ‘घोळात घोळ’, ‘आली लहर केला कहर’ यांसारख्या अनेक चित्रपटांतून त्यांनी भूमिका गाजवल्या आहेत.

Web Title: The death of Vijay Chavan in the mill workers grieved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.