मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला दीपक सावंत यांचा राजीनामा, एकनाथ शिंदेंकडे आरोग्य खात्याचा अधिभार!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 12:36 PM2019-01-07T12:36:02+5:302019-01-07T12:56:47+5:30
सावंत यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला असून आरोग्य खात्याचा अधिभार शिवसेना नेते आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे.
मुंबई - शिवसेना नेते डॉ. दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला होता. सावंत यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला असून आरोग्य खात्याचा अधिभार शिवसेना नेते आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. पक्षावर नाराज नाही, मात्र पक्षाकडून नवीन जबाबदारीची अपेक्षा असल्याने राजीनामा दिल्याची माहिती दीपक सावंत यांनी दिली आहे.
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून पत्ता कापण्यात आल्यामुळे डॉ. दीपक सावंत यांनी गेल्या वर्षी 4 जुनला राजीनामा दिला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना राजीनामा थांबवण्याचा सल्ला दिला. यानंतर सावंत यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. त्याआधी त्यांनी 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरेंकडे राजीनामा सुपूर्द केला होता.
आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या खात्याचा अधिभार एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणार #Eknath Shinde
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) January 7, 2019
मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेने विलास पोतनीस यांना उमेदवारी देत सावंत यांना डच्चू दिला. विलास पोतनीस हे शिवसेनेचे बोरिवलीचे विभागप्रमुख आहेत. त्यांनी पदवीधर मतदारसंघातून मोठा विजय मिळवला आहे. आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या कार्यपद्धतीबाबत शिवसैनिकांमध्ये आणि विशेष करून युवासेनेमध्ये नाराजी होती. त्यामुळे सावंत यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.