कमाल, किमान तापमानात आठ अंशांचा फरक; उकाड्यामुळे मुंबईकर घामाघूम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 05:21 AM2019-05-02T05:21:09+5:302019-05-02T06:23:46+5:30
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार ‘फनी’ चक्रिवादळाचा फटका महाराष्ट्राला बसणार नसला तरीदेखील बदलते वातावरण त्रासदायक ठरत आहे.
मुंबई : उष्णतेच्या लाटेने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ होरपळत असून, आता यात पश्चिम बंगालच्या उपसागरात घोंगावत असलेल्या ‘फोनी’ नावाच्या चक्रिवादळाने भर घातली आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार ‘फनी’ चक्रिवादळाचा फटका महाराष्ट्राला बसणार नसला तरीदेखील बदलते वातावरण त्रासदायक ठरत आहे. मुंबईकरांनाही वाढत्या उकाड्याने घाम फोडला असून, मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात तब्बल ८ अंशाचा फरक नोंदविण्यात येत आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, १ मे रोजी मुंबईचे किमान २६ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. तर कमाल तापमानाची नोंद ३४.६ अंश इतकी करण्यात आली आहे. कमाल- किमान तापमानातील फरक पाहिला तर तो ८ अंश असून, येथील आर्द्रता ७० टक्क्यांच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. मागील आठवड्याभरापासून मुंबईचे कमाल तापमान ३४ अंशाच्या घरात नोंदविण्यात येत आहे.
महाराष्ट्राला ‘फनी’ चक्रिवादळाचा धोका नाही
उत्तरेकडून यापूर्वी वारे वाहत होते. परिणामी, तापमानात वाढ नोंदविण्यात येत होती. आता ‘फोनी’ चक्रिवादळामुळे पूर्वेकडून वारे वाहत आहेत. त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी हवामान ढगाळ नोंदविण्यात येत आहे. ढगाळ हवामानामुळे तापमानात किंचित अंशी घट नोंदविण्यात येत आहे. पुढील दोन दिवस राज्यात ठिकठिकाणी हवामान ढगाळ राहील. परिणामी, तापमानात घट होईल. ‘फनी’ चक्रिवादळाचा महाराष्ट्राला धोका नाही. कोकणात हवामानात बदल नोंदविण्यात येत आहे. परिणामी, येथे हलक्या पावसाची शक्यता आहे. - शुभांगी भुते, संचालिका, मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग
चार दिवस विदर्भात उष्णतेची लाट
२, ३, ४ आणि ५ मे रोजी विदर्भात उष्णतेची लाट राहील. गुरुवारसह शुक्रवारी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश अंशत: ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५, २६ अंशाच्या आसपास राहील.