एका दिवसाच्या मुंबई सफरीत ही ठिकाणं विसरु नका.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2017 12:50 PM2017-11-02T12:50:38+5:302017-11-02T14:46:51+5:30

Do not forget these places in one day's Mumbai trip. | एका दिवसाच्या मुंबई सफरीत ही ठिकाणं विसरु नका.

एका दिवसाच्या मुंबई सफरीत ही ठिकाणं विसरु नका.

googlenewsNext
ठळक मुद्देमुंबई ही काही एका दिवसात संपणारी गोष्ट नाही. पण त्यातल्या त्यात जास्त ठिकाणं पाहण्याचा प्रयत्न केला जातो.इकडे पर्य़टनासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यातून कितीही ठिकाणं फिरलो तरी बाकीची राहील्याची खंत असतेच. आम्ही मुंबईत एका दिवसात फिरण्यासाठी एक योग्य वेळापत्रक देणार आहोत. जेणेकरून तो संपूर्ण एक दिवस सार्थकी लागेल.

मुंबई : महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या कोणत्याही भागातून मुंबईत येणाऱ्या पर्यटकाला सगळ्यात मोठा प्रश्न पडतो तो म्हणजे कुठे कुठे फिरायचं. कारण इकडे पर्य़टनासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यातून कितीही ठिकाणं फिरलो तरी बाकीची राहील्याची खंत असतेच. काही कामानिमित्त मुंबईत अनेकांची ये-जा सुरू असते. त्यामुळे या कामाच्या वेळापत्रकातून वेळ काढत काही पर्यटक निदान एक दिवस तरी संपूर्ण मुंबई पाहण्याचा आग्रह धरतात. त्यासाठी ‘मुंबई सफर’ वगैरे आयोजित केली जाते.  गेल्या काही वर्षात मुंबई अवाढव्य पसरली आहे. त्यामुळे एका दिवसात नक्की कुठे-कुठे फिरायचं हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. म्हणूनच आम्ही मुंबईत एका दिवसात फिरण्यासाठी एक योग्य वेळापत्रक देणार आहोत. जेणेकरून तो संपूर्ण एक दिवस सार्थकी लागेल.

सिद्धिविनायकाची काकड आरती

तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात सकाळी पाच वाजता केलीत तर बरोबर 5.30 वाजता दादरच्या सिद्धिविनायक मंदिरात हजर व्हा. 5.30 वाजता तिकडे काकड आरती केली जाते. दिवसाची सुरुवातच जर बाप्पाच्या चरणी अर्पण केली तर संपूर्ण दिवस नक्कीच चांगला जाणार. त्यानंतर तेथून थेट टॅक्सी करा किंवा तुमची स्वतःची कार असेल तर उत्तमच. गाडीने थेट हाजीआली दर्ग्याला भेट द्या. दादरपासून अवघ्या 25 मिनिटावर हाजीआली दर्ग्याला आपण पोहोचू शकतो. तिकडे जाण्यामागचं मुख्य कारण म्हणजे तेथे मिळणारे फास्ट फूड. हाजी आली दर्ग्यातून दर्शन घेऊन झाल्यानंतर तेथे जवळपास असलेल्या स्टॉल्सला नक्की भेट द्या. तिकडे म्हणे वेगवेगळ्या फळांचे ज्यूस फार छान मिळतात. नाश्ता झाल्यानंतर जीवाला शांत करण्यासाठी इकडच्या थंडगार पेयांचा आस्वाद घ्यायला काहीच हरकत नाही.

वांद्रे-वरळी सीलिंक

वांद्रे-वरळी सीलिंक म्हणजे मुंबईची खरी शान आहे. मुंबई उपनगर आणि दक्षिण मुंबईला जोडणारा लिंक 5.6 किमी लांबीचा आहे. तेथून थोडंसं अंतर गेलात की तुम्ही पोहचाल बँड स्टँडला. मुंबईतील बँण्ड स्टँड प्रसिद्ध असण्यामागे तेथे अनेक बॉलिवूड अभिनेत्यांचे बंगले आहेत. शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याबाहेर तर त्याच्या फॅन्सची रांगच लागलेली असते. त्याची एक झलक दिसावी याकरता तेथे सतत गर्दी असते. एका ठराविक वेळी तो गॅलरीतून दर्शनही देतो. हाजीअली येथून तुम्ही 9 वाजता निघालात तर इकडे तुम्ही दुपारी 12 वाजेपर्यंत मस्त वेळ घालवू शकाल. कॉलेज विद्यार्थ्यांचे, जोडप्यांचं नेहमीचं ठिकाण असल्याने येथे तरुणांची गर्दी जास्त प्रमाणात असते. शिवाय फोटोग्राफीसाठीही बॅण्ड स्टँण्ड उत्तम आहे.

लंच आणि शॉपिंग अ‍ॅट लिंकिंग

मग तुम्ही वांद्य्रातच असलेल्या लिंक रोडला नक्की भेट द्या. मनसोक्त शॉपिंग करा. आपल्या बजेटमध्ये येथे शॉपिंग करायला मिळते. मुंबईतल्या मुलींसाठी तर लिंक रोड म्हणजे जीव की प्राण. वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आणि आपल्या बजेटमध्ये आपण शॉपिंग करू शकतो. पण शॉपिंग केल्याने मन भरत असलं तरी पोट भरत नाही ना. 12 नंतर तुम्हाला थोडीशी भूक लागेल. तिकडेच असलेल्या परशिअन दरबार या हॉटेलमध्ये तुम्ही जाऊ शकता. तिकडे थोडासा खिसा रिकामा होईल पण उत्तम जेवण करायला मिळेल. चिकन क्रिस्पी, चिकन मंगोलियन, फिश थाय प्लेट असे मासांहारी जेवण तर शाकाहारांसाठीही या हॉटेलमध्ये खास मेन्यू असतो. पोटभर जेऊन झालं की गाडीला किक मारायची आणि थेट गेट वे ऑफ इंडिया गाठायचं.

गेट वे ऑफ इंडिया

जेवून अगदी 2 नंतर आरामात तुम्ही तुम्ही गेटवेपर्यंत 3 वाजता पोहोचाल. ट्रॅफिक असेल तर आणखी वेळ लागू शकतो. पण दुपारच्या वेळी जास्त वर्दळ नसल्याने तासाभरात गेटवे पोहचाल. गेटवे पोहचताना अनेक ऐतिहासिक स्थळं पाहता येतील. मुंबई महानगरपालिकेची वास्तु, सीएसटी स्थानकाचं भव्य कार्यालय, रिगल सिनेमा, नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्ट, दविड ससून ग्रंथालय, आर्मी आणि नेव्ही इमारत या सगळ्यांचं दर्शन घेत घेत तुम्ही गेटवेला पोहोचाल. गेटवेला पोहोचलात की तुम्हाला तिथे जहाजात बसण्याचीही संधी मिळेल. तिथून एलिफंटा लेणी अवघ्या तासाभरात आहे. मात्र संपूर्ण लेणी फिरायला तीन तास तरी लागतात. त्यामुळे लेणीमध्ये जाण्यापेक्षा बोटीनेच समुद्राची सफर केली तरी चालेल. जहाजामधून फिरून आलात की एक फेरफटका संपूर्ण गेटवेच्या परिसराला मारा. सायंकाळी 6 च्या दरम्यान तिथे फार गडबजाट असतो. आता तुम्ही गेटवेला गेलाच आहात तर हॉटेल ताज कसं मिस करू शकता? गेटवेच्या अगदी समोरच असलेल्या ताज हॉटेल पाहण्यासाठीच फार गर्दी असते. त्यामुळे तुम्हीही ते हॉटेल न्याहाळून घ्या. हे सगळं करेपर्यंत तुम्हाला 6 तरी नक्कीच वाजणार. 

चौपाटीवरील सूर्यास्त

सहा वाजता समुद्रकिनाऱ्यावरून सूर्यास्ताचे दृष्य पाहायला कोणाला आवडणार नाही? तिथून थेट गाडी काढायची आणि गिरगाव चौपाटीला पोहाचयं. अवघ्या अर्ध्या तासात तुम्ही तिकडे पोहोचाल. एवढं सगळं फिरून तुम्हाला थोडी भूक लागली असेल तर चौपाटीवरच अनेक खाण्याचे स्टॉल्स आहे. पाणीपुरीपासून ते पावभाजीपर्यंत सारं काही इथे मिळेल. त्यामुळे संध्याकाळच्या नाश्त्याची सोय झालीच म्हणून समजा. तुम्हाला अजून काही फिरायचं असेल तर तेथे जवळच असलेल्या कुलाबा कॉजवेला भेट द्या. पुस्तकं, ज्वेलरी, लहान-लहान पुतळे आणि सनग्लासेस तुम्ही येथून विकत घेऊ शकता. 

डिनर अ‍ॅट लिओपोल्ड कॅफे

हे सगळं करता करता तुम्हाला 8 किंवा 9 वाजतील. आता तुमच्या पोटात कावळे ओरडायला सुरुवात होईल. मग डिनरसाठी लिओपोल्ड कॅफे सगळ्यात बेस्ट.  या कॅफेमध्ये फार गर्दी असते. निदान अर्धातास थांबल्याशिवाय आपल्याला बसायला जागाच मिळत नाही. मुंबईत पर्यटनाला येणारे बहुतेक पर्यटक या हॉटेलला आवर्जून भेट देतात. त्यामुळे येथे परदेशी पर्यटकांचीही संख्या जास्त प्रमाणात असते. नूडल्सपासून ते बर्गर आणि डिनरच्या सगळ्या मेन्यूपर्यंत सारं काही येथे मिळतं. 

मरिन ड्राईव्ह आणि नरीमन पॉईंट

हुश्शश ... दिवस संपला. चौपाटीपासून थोड्याच अंतरावर मरिन ड्राईव्ह आणि त्याच्या पुढे नरिमन पॉईंट आहे. जेवणावर मस्त ताव मारून झाल्यावर मरिन ड्राईव्हवर शतपावलीसाठी जा. रात्रीचं तेथील शांत वातावरण दिवसभराची दगदग विसरायला भाग पाडतं. रात्रीच्या अंधारात चांदण्याच्या उजेडात मरिन ड्राईव्ह अधिक खुलून दिसतो. छान शतपावली करून झाल्यावर तुमच्या नियोजित हॉटेलमध्ये किंवा नातेवाईकांकडे जा. 

एका दिवसात मुंबई फिरणं फार कठीण आहे. कारण मुंबईचं ट्रॅफिक केव्हाही धोका देऊ शकतं. पण तरीही तुमचं नशीब चांगलं असेल तर तुम्हाला वर सांगितलेल्या सगळ्या गोष्टी अगदी वेळेत करता येतील.

Web Title: Do not forget these places in one day's Mumbai trip.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.