मुंबईतील 'या' भयानक आणि झपाटलेल्या जागा माहितेयत का?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2017 06:56 PM2017-10-27T18:56:19+5:302017-10-30T11:06:12+5:30
भुत-प्रेत या संकल्पनेवर आजपर्यंत अनेकदा वाद झालेआहेत. मात्र गजबजलेल्या मुंबईत आजही या काही जागा आहेत जिथे भुतं आहेत, असं स्थानिकांचं म्हणणं आहे.
मुंबई - सांगोवांगी पद्धतीने अनेक भुतांच्या कथा आपल्यापर्यंत येत असतात. प्रत्येक गावात भुतांच्या अनेक दंतकथा सांगितल्या जातात. काही ठिकाणी भुतांचा ठराविक कालावधी असतो, त्यामुळे त्या कालावधीत तेथे लोक जायलाही घाबरतात. त्याचप्रमाणे मुंबईत अशाच अनेक भयानक जागा आहेत, ज्या आजही भुताने झपाटलेल्या आहेत, असे म्हटले जाते किंवा या जागेत आजही भुतांचा वावर असल्याचं अनेक जाणकार आणि तेथील स्थानिक सांगतात. अशाच मुंबईतील अनेक भयानक जागा आज आपण पाहणार आहोत.
मुंबई हायकोर्ट
ब्रिटीशांनी बांधलेल्या अनेक वास्तू मुंबई परिसरात आहेत. चर्चगेट आणि फोर्ट विभागात या इमारती पहायला मिळतात. या इमारतींमध्ये आज अनेक कार्यालये आहेत, जी संध्याकाळी ७ नंतर मोकळी होतात. त्यामुळे या परिसरात प्रचंड शुकशुकाट असतो. तसंच बॉम्बे हायकोर्टात एक द्विभाषिक भुताचा वावर असल्याचं म्हटलं जातं. तेथे रात्रीच्या वेळी टाइपरायटर वाजल्याचा आवाज येतो, असंही सांगितलं जातं.
ताजमहल हॉटेल
मुंबईची शान असलेलं पंचतारांकित ताजमहल हॉटेलही भुताने झपाटलेलं आहे, असं सांगितलं जातं. हे हॉटेल बांधून झाल्यावर त्या हॉटेलच्या वास्तुविशारदाने आत्महत्या केली होती. कारण या हॉटेलचं प्रवेशद्वार चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आलं होतं. त्यामुळे त्या वास्तुविशारदाचा आत्मा जुन्या ताजमहाल हॉटेलमध्ये फिरताना पाहिल्याचा अनेकांचा दावा आहे. मात्र हे भूत कोणालाच त्रास देत नसल्याचंही सांगितलं जातं.
मुकेश मिल, कुलाबा
अनेक हिंदी हॉरर चित्रपटाचे चित्रिकरण या ठिकाणी झालं आहे. कारण या मिलला मुळातच एक भयानक रुप आहे. काही वर्षांपूर्वी या मिलला आग लागली होती. त्यामध्ये अनेकांचे जीव गेले होते. शिवाय खूप मोठ्या प्रमाणात नुकसानही झालं होतं. तेव्हापासून ही मिल बंद आहे. पण येथे रात्रीच्या वेळी महिलांना भूत झापटतं अशी आख्यायिकाही सांगितली जाते.
ग्रॅण्ड पॅरडी टॉवर, मलबार हिल
मलबार हिलमधल्या केम्प्स कॉर्नरच्या ग्रॅन्ड पारडी टॉवरच्या आठव्या मजल्यावरील वासुदेव आणि तारा दलाल या वृद्ध दाम्पत्याने मुलगा आणि सून यांच्या छळाला कंटाळून आठव्या मजल्यावरून उडी टाकून आत्महत्या केली होती. त्यानंतर सात वर्षानी त्याच खिडकीतून मुलगा बाळकृष्ण, त्याची पत्नी सोनल आणि त्यांची कॉलेजमध्ये जाणारी तरुण मुलगी पूजा यांनी उडी टाकून आत्महत्या केली होती. १९७६ मध्ये ही इमारत बांधली गेली तेव्हापासून कित्येक मुलं, नोकर यांनी आत्महत्या केली आहे. म्हणून या इमारतीत घर घ्यायला लोक घाबरतात.
डिसोझा चाळ, माहिम
माहीमची डिसोझा चाळीतही एका भुताचा वावर असल्याचं म्हटलं जातं. त्याठिकाणी एक विहिर होती. एकदा एक महिला पाणी भरत असताना त्या विहिलीचा भिंत कोसळली आणि ती महिला विहिरीत पडली. तेव्हापासून ती महिला तेथे भुताच्या स्वरुपात वास्तव्यास असल्याचं काहीजण सांगतात.
राम रक्षित इमारत, माहिम
माहीमच्या राम रक्षित इमारतीतील एक विहीर बंद करून ठेवली आहे. वीस वर्षापूर्वी त्या इमारतीत एका ५० वर्षीय महिलेने जीव दिला होता. तेव्हापासून दर अमावस्येला ती तिथे येते, असं तिथले रहिवासी सांगतात. माहीम स्थानकाजवळची नासीरनजी वाडी हीदेखील अशीच एक झपाटलेली जागा. ही जागा नारसी नावाच्या पारशाची होती. त्याचा जाळून खून करण्यात आला. रात्रीच्या वेळी तिथे कोणी जात नाही. कारण काही लोकांच्या मते, तो पारशी रात्रीच्या वेळी आपल्या जागेची पाहणी करायला येतो. आतापर्यंत तिथे सात ते आठ लोक मरण पावले आहेत.
मार्वे मढ आयलंड
मालाडच्या मार्वे मढ आयलंडच्या रस्त्यावर एक नववधू फिरताना दिसते. या रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांना थांबवून मदत मागते आणि जो कोणी तिला मदत देईल त्या गाडीचा अपघात घडते असं येथील स्थानिक सांगतात. काही वर्षांपूर्वी या महिलेचा तिच्या लग्नादिवशीच खून झाला होता, त्यानंतर तिला तिथल्याच खारफुटीमध्ये टाकण्यात आलं होतं. म्हणून ती येथे वावरत असते.
एसएनडीटी कॉलेज, जुहू
जुहू येथील एसएनडीटी कॉलेजच्या शिक्षक वसाहतीत एक शिक्षिका रात्री दोनच्या सुमारास मोठमोठ्याने पाढे म्हणताना ऐकू येतं. हा आवाज स्थानिक रहिवाशांनी ऐकला आहे. काही मुलांनी याचा छडा लावायचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना काहीच सापडलं नाही. ते गेल्यावर पुन्हा आवाज आला.
सांताक्रुझ
सांताक्रूझ पश्चिमेला एका इमारतीला एका महिलेने पछाडलं आहे. या महिलेला ‘सेकंड फ्लोअर की भाभीजी’ असंही म्हणतात. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर एका विवाहितेचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून एक कुत्रा दिवस-रात्र त्या घराबाहेर बसलेला असतो. तो दिवसभर काहीच करत नाही. मात्र रात्री जोरजोरात रडतो किंवा एका बाईच्या रडण्याचा आवाज येतो.
आयसी कॉलनी, बोरीवली
बोरीवलीच्या आयसी कॉलनीत प्लॉट नं. १८ येथील बगिचा लहान मुलांसाठी फार प्राणघातक आहे. येथे खेळायला गेलेल्या मुलांना इजा होते असं सांगण्यात येतं. येथील जागा विकली गेली तेव्हा तिथल्या माळ्याची नोकरी गेली होती, त्यामुळे त्याने तेथेच आत्महत्या केली. त्यामुळे येथे खेळायला येणाऱ्या लहान मुलांना हा माणूस त्रास देतो असं सांगण्यात येतं.
मुळातच विज्ञानात कोणीही भुतांचं समर्थन करत नाही. हे सारे आपल्या मनाचे खेळ आहेत. त्यामुळे अशा विषयांवर किती विश्वास ठेवायचं हे आपण ठरवायला हवं. आम्ही केवळ मुंबईतील या ठिकाणांबाबतचे काही समज-गैरसमज समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.