टिक टिक वाजते डोक्यात... शिवसेनेला जय महाराष्ट्र करत डॉ.अमोल कोल्हे पवारांच्या राष्ट्रवादीत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2019 02:57 PM2019-03-01T14:57:13+5:302019-03-01T15:29:50+5:30
अमोल कोल्हे यांना आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून तिकीट दिले जाणार असल्याची माहिती
मुंबई - राजा शिवछत्रपती मालिकेत राजे शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी मालिकेत संभाजीराजेंची भूमिका साकारणारे अभिनेता अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गोटातून मोठा जनाधार असलेला एक चेहरा कमी झाला आहे . काही दिवसांपूर्वीच अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळीच, सोशल मीडियावर अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र, आता अधिकृतपणे अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीकडून तिकीट दिले जाणार आहे. त्यामुळे अमोल कोल्हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे समजते. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत दोन माजी आमदारही राष्ट्रवादीचं घड्याळ आपल्या मनगटावर बांधणार आहेत. मुंबईत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व इतर राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला. मात्र, शिवसेनेकडून त्यांच्या प्रवेशाचे वृत्त फेटाळण्यात आले होते. मात्र, आज मुंबईत अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत अमोल कोल्हेंचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला आहे. अमोल कोल्हे यांच्यासह बदनापूरचे माजी आमदार अरविंद चव्हाण यांनीही भाजपा सोडून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात केला आहे. तसेच यश मिलिंद पाटील, किशोर प्रकाश पाटील, डॉ हर्षल यशवंत पवार, वरपे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
दरम्यान, यापूर्वी संभाजी ब्रिगेडचे प्रविण गायकवाड यांच्यासह अमोल कोल्हे यांनी बारामतीच्या गोंविंदबाग येथील निवासस्थानी जाऊन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. विशेष म्हणजे प्रविण गायकवाड यांनाही पुण्यातून लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या कोट्यातून तिकीट देणार असल्याच्या बातम्या त्यावेळी आल्या होत्या. दरम्यान, अमोल कोल्हे यांनी राजे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या भूमिका साकारल्या आहेत. तर, त्यांच्या या दोन्ही भूमिकांना मराठी प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. त्यामुळेच त्यांचा मोठा चाहतावर्ग महाराष्ट्रात आहे.