डॉ. लहाने आता ‘जे.जे.’चे नेत्रतज्ज्ञ! वैद्यकीय शिक्षण संचालकांनी काढले आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 03:20 AM2017-10-08T03:20:16+5:302017-10-08T03:20:26+5:30
जे.जे. हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी जे.जे.च्या डीनपदाचा पदभार सोडल्यानंतर आता ‘जे.जे.’च्याच नेत्र शल्यचिकित्सा विभागात त्यांनी नेत्रतज्ज्ञ म्हणून काम करावे, असे आदेश वैद्यकीय शिक्षण संचालकांनी काढले आहेत.
मुंबई : जे.जे. हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी जे.जे.च्या डीनपदाचा पदभार सोडल्यानंतर आता ‘जे.जे.’च्याच नेत्र शल्यचिकित्सा विभागात त्यांनी नेत्रतज्ज्ञ म्हणून काम करावे, असे आदेश वैद्यकीय शिक्षण संचालकांनी काढले आहेत.
डॉ. लहाने यांची सहसंचालकपदी बढती झाली होती. पण जे.जे.चा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी त्यांना डीन पदावरच राहण्याच्या सूचना दिल्या. मात्र जे.जे.मधील काही डॉक्टर्स खासगी प्रॅक्टीस करतात, काही डॉक्टर कामावरच येत नाहीत याविरुद्ध डॉ. लहाने यांनी मोहीम हाती घेतली होती. त्यांनी जे.जे.तील गैरप्रकारांना आळा घालण्याचे काम केल्याने अस्वस्थ लॉबीने त्यांच्याविरुद्ध तक्रारी सुरू केल्या. त्याच काळात डॉ. लहाने यांची सहसंचालक म्हणून बढती झाली. त्यामुळे त्यांना डीन पदावरून दूर करा, अशा मागण्या करणे सुरू झाले. डॉ. लहाने यांनी स्वत:च जे.जे.च्या डीनपदाचा पदभार
डॉ. सुधीर नणंदकर यांना सुपुर्द केला. मात्र, जे.जे.तील डोळ्यांची आॅपरेशन्स कोण करणार, असा प्रश्न होता. यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर डॉ. लहाने यांना सहसंचालकपद सांभाळून जे.जे.तील नेत्र शल्यचिकित्सा विभागात नेत्रतज्ज्ञ म्हणून काम करावे, असे आदेश काढले आहेत. सोमवारपासून डॉ. लहाने जे.जे.च्या नेत्रविभागात कार्यरत राहतील.