पुलाचा गर्डर घसरून अपघात, दोन कामगार जखमी, सहा तास सेवा ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 03:19 AM2019-06-13T03:19:12+5:302019-06-13T03:19:46+5:30
बोर्डी रोड रेल्वे स्थानकातील घटना : दोन कामगार जखमी, सहा तास सेवा ठप्प
बोर्डी : महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील पश्चिम रेल्वेच्या बोर्डी रोड स्थानकात बुधवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास ओव्हरब्रिजच्या बीमवर पाच लोखंडी गर्डर ठेवण्याचे काम सुरू होते. त्या वेळी जोराचा वारा आणि पावसाने गर्डर घसरल्याने अप व डाऊन मार्गावरील सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली. या घटनेमध्ये दोन कामगार जखमी झाले आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत हे काम युद्धपातळीवर सुरू होते. त्यानंतर आठ वाजून तीन मिनिटांनी गाड्यांची सेवा पूर्ववत झाली.
या स्थानकात ओव्हरब्रिजच्या कामाकरिता सकाळच्या सत्रात काही काळासाठी ब्लॉक घेऊन बीमचे काम पूर्ण करून त्यावर आडवे पाच लोखंडी गर्डर टाकण्यात आले. मात्र दुपारी सव्वादोनच्या सुमारास जोराचा वारा आणि पाऊस सुरू असताना गर्डर घसरून अडकून राहिले, तेथे कार्यरत दोन कामगारांनी जीव वाचविण्यासाठी वरून उड्या घेतल्याने ते जखमी झाले. दरम्यान, त्याच वेळेस ब्लॉकही हटविण्यात आल्याने तेथून मालगाडी जात होती. पण, तिला काहीही झाले नाही. सुदैवाने मोठा अपघात टळला. रेल्वे प्रशासनाने तत्काळ अप आणि डाऊन मार्गावरील सेवा थांबविली. रेल्वे कर्मचारी उशिरापर्यंत हे काम करीत होते.
गूढ कायम
हा अपघात जोराच्या वाऱ्यामुळे झाला की कामात राहिलेल्या त्रुटीने, याबाबत अद्याप खुलासा झाला नाही. रेल्वे अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला.