सुट्यांमुळे पर्यटनस्थळे फुल्ल!, देवस्थानीही भक्तांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 06:18 AM2017-12-26T06:18:57+5:302017-12-26T06:19:05+5:30
मुंबई : शनिवार, रविवार आणि नाताळ अशा सलग सुट्या आल्यामुळे राज्यभरातील सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांनी भरून गेली आहेत.
मुंबई : शनिवार, रविवार आणि नाताळ अशा सलग सुट्या आल्यामुळे राज्यभरातील सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांनी भरून गेली आहेत. कोकणातील मालवण, रत्नागिरी या समुद्र किनाºयांना पर्यटकांनी विशेष पसंती दिली आहे. तसेच शिर्डी, अक्कलकोट आदी देवस्थानीही भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. त्यामुळे प्रमुख रस्त्यांवर वाहतूककोंडी जाणवत आहे. मालवण शहराजवळचे सर्व किनारे पर्यटकांच्या वर्दळीने फुलून गेले आहेत. रविवारी तर सुमारे ३० ते ४० हजार पर्यटकांनी सिंधुदुर्गाचे दर्शन घेतल्याचे बंदर विभागाच्या सूत्रांनी सांगितले. मालवणातील अरुंद रस्त्यांचा विचार करता जिल्हा पोलीस प्रशासनानेही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चोख नियोजन केले. तारकर्ली-देवबाग मार्गावरही तीन कर्मचारी गस्त घालत होते. रविवार व सोमवारी पर्यटकांच्या उसळलेल्या गर्दीने दुपारी १२ वाजल्यापासून छोट्या-मोठ्या हॉटेलात जेवणासाठी पर्यटकांच्या रांगा लागल्या होत्या.
अकोले (जि. अहमदनगर) येथील ब्रिटिशकालीन भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील रिंगरोडवरील आदिवासी पाड्यांमधे जलाशयाच्या भोवती पर्यटकांच्या निवासासाठी सुमारे दोन हजार कापडी ‘तंबू’ सज्ज झाले असून, नाताळनिमित्त ‘भंडारदरा-रंधा-घाटघर-रतनगड-साम्रद’ परिसरात मोठी गर्दी होत आहे. श्रीक्षेत्र अक्कलकोट येथेही गेल्या तीन दिवसांत लाखो भक्तांची मांदियाळी होती. राज्यासह परराज्यातील स्वामी भक्तांमुळे अक्कलकोट नगरी
स्वामी नामाने गजबजून गेली होती. श्री स्वामी समर्थांच्या दर्शनानंतर श्रीक्षेत्र गाणगापूर, तुळजापूर, पंढरपूरकडे भक्त जात आहेत.
>गोव्यात तारांकीत हॉटेलांचे दर गगनाला
नव्या वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात उच्चभ्रू व्यक्तींची वर्दळ वाढणार असल्याचे गृहीत धरून तारांकित हॉटेलच्या खोल्यांच्या दरात कमालीची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मात्र यंदा पाहुण्यांची संख्या तुलनेने कमीच असल्याचे हॉटेल व्यावसायिकांचे म्हणणे आहे. पंचतारांकित हॉटेलमध्ये दिवसासाठी साठ हजार ते एक लाखापर्यंत दर आकारण्यात येत होता.