महापालिकेने केलेल्या कामांमुळेच मुंबई पूर्वपदावर, तब्बल ९ किलोमीटर उंचीचा ढग होता - उद्धव ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 03:48 AM2017-08-31T03:48:02+5:302017-08-31T03:48:17+5:30
मंगळवारी मुंबईवर तब्बल ९ किलोमीटर उंचीचा ढग होता. एका मर्यादेपर्यंत आपण निसर्गाशी मुकाबला करू शकतो.
मुंबई : मंगळवारी मुंबईवर तब्बल ९ किलोमीटर उंचीचा ढग होता. एका मर्यादेपर्यंत आपण निसर्गाशी मुकाबला करू शकतो. मुंबई महापालिकेने केलेल्या कामांमुळेच मंगळवारच्या मुसळधार पावसानंतर शहर दुस-या दिवशी पूर्वपदावर आले, असा दावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.
मंगळवारच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून मुंबई ठप्प झाली होती. या पार्श्वभूमीवर पालिकेतील सत्ताधारी शिवसेना राजकीय विरोधकांसह सामान्य मुंबईकरांच्या टीकेचे लक्ष्य बनली आहे. उद्धव यांनी मात्र शिवसेनेवरील सर्व आरोप फेटाळून लावतानाच महापालिकेचे कर्मचारी आणि रस्त्यावर उतरून मुंबईकरांसाठी झटणाºया शिवसैनिकांमुळेच दुसºया दिवशी जनजीवन सुरळीत झाल्याचे सांगितले.
या पावसाने नागरिकांची गैरसोय झाली, हे आम्ही पूर्णपणे मान्य करतो. कालच्या पावसाची २६ जुलैच्या पावसाबरोबर तुलना करत असाल तर, निश्चितच मुंबईत २६ जुलैसारखी परिस्थिती नव्हती. मुसळधार पावसाचा अंदाज असला तरी, अतिवृष्टी होईल असे वाटले नव्हते. मुंबईत पम्पिंग स्टेशन्समधून सहा ते आठ हजार दशलक्ष लीटर पाणी बाहेर काढण्यात आले. अतिवृष्टीनंतर महापालिकेने केलेल्या प्रयत्नांमुळेच परिस्थिती लवकरात लवकर नियंत्रणात आल्याचे उद्धव म्हणाले. पावसामुळे अनेक ठिकाणी कचरा रस्त्यावर आल्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्यापासून शिवसेनेकडून मुंबईत आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. याशिवाय, लेप्टोसारख्या आजारांपासून मुंबईकरांचा बचाव करण्यासाठी पालिकेकडून रात्रीपर्यंत सूचना पत्रक जारी करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
एक तासात ५० मिमी पाऊस
पत्रकार परिषदेला पालिका आयुक्त अजय मेहताही उपस्थित होते. आजच्या मुंबईकडे पाहून काल भरपूर पाऊस होता असे वाटत नाही. मिठी नदीचे रुंदीकरण आणि खोलीकरण झाल्याने मिठी नदीला पूर आला नाही. मुंबईत २६ ठिकाणी एका तासात ५० मिलीमीटर पाऊस पडला तर काल दुपारी ३ ते ५ या वेळेत ६० टक्के पाऊस पडल्याची माहिती मेहता यांनी दिली.
नाल्यात उतरून गाळ दाखवा
नालेसफाई झाली नसल्याचा आरोप खोटा आहे. राजकारणासाठी इतक्या खालच्या पातळीवर मला जायचे नाही. नालेसफाईबाबत आरोप करणाºयांनी नाल्यात उतरून गाळ दाखवावा. टीका करणाºयांशी मला काही देणे-घेणे नसून मी जनतेसाठी काम करतो. मला याबाबतीत इतरांवर आरोप करून कुठलेही राजकारण करायचे नाही, असा टोला उद्धव यांनी विरोधकांना लगावला.