एल्फिन्स्टन दुर्घटना; समन्वयाची गाडी घसरल्यानेच गेले बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 05:37 AM2017-10-04T05:37:02+5:302017-10-07T14:30:18+5:30
पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या संथ कारभारामुळे एल्फिन्स्टन दुर्घटना घडली असेच आता समोर येत आहे. पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे प्रशासनाने योग्य पद्धतीने आणि वेळेत समन्वय साधला असता तर एल्फिन्स्टन पादचारी पूल कधीच तयार झाला असता
महेश चेमट
मुंबई : पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या संथ कारभारामुळे एल्फिन्स्टन दुर्घटना घडली असेच आता समोर येत आहे. पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे प्रशासनाने योग्य पद्धतीने आणि वेळेत समन्वय साधला असता तर एल्फिन्स्टन पादचारी पूल कधीच तयार झाला असता; आणि २३ प्रवाशांचे प्राणही वाचले असते, अशी प्रतिक्रिया अनेक अधिकारी ‘आॅफ द रेकॉर्ड’ देत आहेत.
पश्चिम रेल्वेवरील एल्फिन्स्टन स्थानक आणि मध्य रेल्वेवरील परळ टर्मिनस यांना जोडणारा पादचारी पूल बांधण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी पश्चिम रेल्वेवरील एल्फिन्स्टन रोड स्थानकावरील १२ मीटर रुंदीच्या पादचारी पुलासाठी ११.८६ कोटी खर्च अपेक्षित आहे. या खर्चाला माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गेल्या वर्षी मंजुरी दिली. त्याची तरतूददेखील रेल्वे अर्थसंकल्पात करण्यात आली होती.
मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट-२नुसार परळ टर्मिनसचा विकास करण्याचे प्रस्तावित आहे. या टर्मिनससाठी ५१ कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. ३० मे २०१६ रोजी परळ टर्मिनसच्या कोनशिलेचे अनावरण माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केले होते. तेव्हा हा टर्मिनस २०१९पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहितीही देण्यात आली होती. यात फलाटाच्या मध्यभागी पूर्व आणि पश्चिम दिशेला जोडणाºया पादचारी पुलाचा समावेश आहे. एल्फिन्स्टन पादचारी पूल व परळ फलाटावरील पूल हा एकमेकांना जोडला जाणार आहे. परिणामी, मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या समन्वयाने हे काम सुरू होणे अपेक्षित होते.
समन्वयाचा ‘पूल’ बांधणे गरजेचे
एल्फिन्स्टन स्थानकातील फलाटाचा १०० मीटर विस्तार करून पुलाचे काम सुरू होणार आहे. या ठिकाणी रोड कनेक्टिव्हिटी नसल्याने रेल्वे रुळावरून क्रेन आणि संबंधित यंत्रे आणून हे काम करण्यात येणार आहे; शिवाय पूल उभारण्याआधी इलेक्ट्रिक पॉवर प्लॉन्ट सद्य:स्थितीवरून पुढे उभारावे लागणार आहेत. सध्या केवळ दोन तास उपनगरीय रेल्वे सेवा बंद असतात. त्यामुळे हा पूल उभारणे जिकिरीचे काम आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे विभागाने पूल उभारणीच्या कामाला एकत्र सुरुवात केल्यास हा पूल लवकर उभा राहणे शक्य आहे. अन्यथा एका बाजूने पुलाचे काम पूर्ण झाल्यास अपूर्णावस्थेतील पुलामुळे अधिक त्रास होईल, असे पश्चिम रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
रेल्वे स्थानकांवर अखेर सुरक्षा आॅडिट सुरू
मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकांवर स्वतंत्र पथकांतर्फे स्थानकांच्या सुरक्षा आॅडिट कामास मंगळवारी सुरुवात झाली. कमर्शिअल, इंजिनीअरिंग आणि सिक्युरिटी अशा तीन विभागातील प्रत्येकी एक अधिकारी रेल्वे स्थानकांवरील सद्यस्थितीचा आढावा घेतील. मध्य रेल्वेवरील सुरक्षा आॅडिट अहवाल ९ आॅक्टोबरपर्यंत तर पश्चिम रेल्वेच्या स्थानकांचा सुरक्षा अहवाल ८ आॅक्टोबरपर्यंत पूर्ण केला जाईल.
निविदा प्रकार : खुला
निविदा खुली तारीख :
६ आॅक्टोबर २०१५
निविदा बंद तारीख :
१८ डिसेंबर २०१५
निविदा प्राप्त : ४ कंपन्यांकडून
ठेकेदार कंपनी :
प्राइम केके गिरीराज (जेव्ही)
प्रत्यक्ष कामाला सुरुवात :
१६ मे २०१६
काम पूर्ण होण्याचा कालावधी : १५ डिसेंबर २०१८