बुरखा असला तरी प्रवेश द्या!
By admin | Published: February 6, 2017 03:09 AM2017-02-06T03:09:03+5:302017-02-06T03:09:03+5:30
फेब्रुवारी, मार्च महिन्यांत होणाऱ्या बारावी आणि दहावीच्या परीक्षांवेळी बुरखा घातलेल्या विद्यार्थिनींना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात यावा
मुंबई : फेब्रुवारी, मार्च महिन्यांत होणाऱ्या बारावी आणि दहावीच्या परीक्षांवेळी बुरखा घातलेल्या विद्यार्थिनींना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात यावा, असे परिपत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे काढण्यात आले आहे.
या परीक्षांना विद्यार्थिनीने बुरखा घातला असल्यास, काही परीक्षा केंद्रांवर त्यांना प्रवेश नाकारला जातो, अथवा काही ठिकाणी तपासणी केली जाते. अशा पद्धतीने विद्यार्थिनींची तपासणी केल्यास, अथवा त्यांना बुरखा काढण्यास सांगितल्यावर, धार्मिक भावना दुखावू शकतात. त्यामुळे परीक्षा केंद्रावर गोंधळ होऊ शकतो, असे या परिपत्रकात नमूद केले आहे. या गोष्टी टाळण्यासाठी हे परिपत्रक सर्व दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्रांवर पाठवण्यात आले आहे.
काही वर्षांपूर्वी विद्यार्थिनींना परीक्षा केंद्रात प्रवेश करताना बुरखा काढण्यास सांगितले होते. त्यामुळे काही प्रमाणात या केंद्रावर गोंधळ उडाला होता, तर काही ठिकाणी परीक्षा हॉलमध्ये परीक्षा देताना कॉपी करत असल्याच्या संशयावरून बुरखा काढण्यास सांगण्यात आल्याचे प्रकार घडले होते. हे टाळण्यासाठी बोर्डाने आधीच सूचना पाठवल्या आहेत.