मुंबईत झालेल्या मुसळधार पावसात घडलं माणुसकीचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2017 02:21 PM2017-08-31T14:21:40+5:302017-08-31T14:59:50+5:30
मुंबई, दि. 31 - मुसळधार पावसानं मंगळवारी ( 29 ऑगस्ट ) मुंबईला अक्षरशः झोडपून काढले. मात्र भर पावसातही माणुसकीला ...
मुंबई, दि. 31 - मुसळधार पावसानं मंगळवारी ( 29 ऑगस्ट ) मुंबईला अक्षरशः झोडपून काढले. मात्र भर पावसातही माणुसकीला पूर आला होता. मुंबईकरांनी एकमेकांना सहकार्याचा हात पुढे करत मुंबई स्पिरीटचं दर्शन घडवलं. कुर्ला पश्चिम येथील एलबीएस मार्गावरही माणुसकीचे उत्तम उदाहरण पाहायला मिळालं. ऑडी कारचे वायपर नीट सुरू नव्हते, त्यामुळे मुसळधार पावसात कार चालकाला गाडी चालवणे कठीण झाले. यावेळी एक व्यक्ती त्या कारचालकाच्या मदतीला धावून आला व स्वतः गाडीवर बसून तो गाडीची काच हातानं पुसू लागला शिवाय कारचालकाला गाडी कशी वळवावी, याचे मार्गदर्शनही केली.
दरम्यान, अतिवृष्टीने मुंबई आणि परिसरातील जनजीवन ठप्प झाले असताना अनेक ठिकाणी ‘मुंबई स्पिरीट’चे दर्शन घडविले. अनेक संस्था, संघटना, गणेशोत्सव मंडळांच्या जोडीला सामान्य मुंबईकरांनीही आपापल्या क्षमतेनुसार मदतकार्यात सहभाग घेतला. अनेक मुंबईकरांनी फेसबुक, व्हॉटस्अॅप आदी सोशल मीडियावर स्वत:चा मोबाइल नंबर, घरचा पत्ता देत अडकलेल्या प्रवाशांसाठी स्वत:च्या घराचे दरवाजे उघडे केले.
गुरूद्वारासह जैन संघ व मशिदींचा आधार
गणेशोत्सव मंडळांसह येथील गुरूद्वारा, मशिद आणि जैन संघांनी महापुरात अडकलेल्या मुंबईकरांसाठी जेवणासह राहण्याची व्यवस्था केली. दादर गुरुद्वारामध्ये लंगरची व्यवस्था केली होती. फोर्ट भागात अडकलेल्या व्यक्तींसाठी सीएसएमटीजवळील बोरा बाजार मार्गावर श्री फोर्ट जैन संघामध्ये लोकांच्या जेवणाची व्यवस्था होती.
उत्सव मंडपे रिकामी, भाविकांचा पूर ओसरला
सतत कोसळणा-या पावसाचा फटका भाविकांनाही बसला. सकाळी उत्साहात भाविक गणपती दर्शनासाठी घरातून बाहेर पडले होते. पण, दुपारपर्यंत पावसाचा वाढता जोर पाहून भाविकांनी घरी परतण्यास पसंती दिली. लालबाग, परळ, दादर भागात पाणी साचायला लागल्याने येथील प्रसिद्ध मंडळांमध्येही भाविकांची गर्दी दुपारनंतर कमी झाल्याचे दिसून आले. परळ येथील तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टच्या गणेशमूर्तीसमोरील सजावटीचा काही भाग दुपारी साडेबाराच्या सुमारास कोसळला. यात हानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या मदतीने सजावटीचा कोसळलेला भाग बाजूला करण्यात आल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली. मंगळवारी पाच दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन होते. रस्त्यांवर पाणी साचल्याने विसर्जनासाठी कसे जायचे? असा प्रश्न अनेक भाविकांना भेडसावत होता. मुसळधार पावसामुळे गणपती विसर्जनासाठी अनेक विघ्न आली. तरीही जमेल तसा भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. गणपती विसर्जनासाठी येणाºया भाविकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून मुंबईतील चौपाट्यांवर पोलीस तैनात करण्यात आले होते.
पोलीस आणि सुरक्षा रक्षकांनी विसर्जनसाठी चौपाट्यांवर तसेच कृत्रिम तलावाकडे आलेल्या भाविकांना मदत केली. दुपारी साडेचारच्या सुमारास भरती असल्यामुळे त्यावेळी भाविक विसर्जनासाठी बाहेर पडले नाहीत. त्यानंतर सायंकाळी गणपती विसर्जनासाठी गर्दी होत होती.