अक्षय तृतीयेचा मुहूर्त : देशभरात ६ हजार कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 08:08 AM2019-05-07T08:08:12+5:302019-05-07T08:09:51+5:30
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यंदा सोने खरेदीत किमान १५ ते २० टक्के वाढ होण्याची शक्यता या क्षेत्रातील जाणकारांनी वर्तवली आहे.
खलील गिरकर
मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यंदा सोने खरेदीत किमान १५ ते २० टक्के वाढ होण्याची शक्यता या क्षेत्रातील जाणकारांनी वर्तवली आहे. इंडिया बुलियन अॅण्ड ज्वेलर्स असोसिएशनचे सचिव सुरेंद्र मेहता यांनी सांगितले की, या मुहूर्तावर सोने खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठी असते. दरवर्षी त्यात वाढ होत आहे. यंदा देशभरात सुमारे ६ हजार कोटींचे २३ टनापेक्षा जास्त सोने खरेदी केली जाईल, असा अंदाज आहे. गेल्यावर्षी २० टन सोने खरेदी झाली होती.
मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा एक तोळ््याचा (१० ग्रॅम) दर सोमवारी ३१ हजार ५०८ रुपये होता. ३ टक्के जीएसटीसह ३२ हजार ४५४ रुपये दर आहे. फेब्रुवारी महिन्यात सोन्याचा दर ३५ हजार होता. ऑनलाइन खरेदीला प्रतिसाद पारंपरिक खरेदीसोबतच ग्राहक मोठ्या प्रमाणात ऑनलाइनद्वारे सोने खरेदी करत असल्याचे चित्र आहे. यात दक्षिणेतील राज्ये आघाडीवर असून दिवसाला सुमारे ६ किलो सोन्याची विक्री होत आहे.
गृह खरेदीला चालना मिळणार
गृह खरेदीसाठी विविध आकर्षक योजना जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे गृह खरेदीला चालना मिळणार आहे. नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलचे (नरेडको) महाराष्ट्र उपाध्यक्ष अशोक मोहनानी म्हणाले, जीएसटीचे सुधारित दर व रिझर्व्ह बँकेच्या कर्जदरात कपात झाल्याने गृह विक्रीत यावर्षी चांगली वाढ होईल.
जळगावात २०० रूपयांची वाढ
जळगाव सराफ बाजारात दोन दिवसांत सोन्याच्या भावात दोनशे रूपयांनी वाढ झाली. सोने ३२,२०० रुपये तोळा झाले आहे़ चांदीचा दर ३८,५०० रुपये किलो आहे.