पश्चिम रेल्वे मार्गावर वाढले फुकटे प्रवासी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 06:12 AM2019-03-13T06:12:48+5:302019-03-13T06:15:27+5:30
दंडाच्या रकमेत १७.६७ टक्क्यांची वाढ
मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर विनातिकीट प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यांना रोखण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाने तिकीट तपासनीसांचे पथक उभारून एप्रिल २०१८ ते फेब्रुवारी २०१९ पर्यंत ११६.८६ कोटींचा दंड वसूल केला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा १७.६७ टक्के दंडाची रक्कम वाढली आहे. त्यामुळे या मार्गावर फुकट्या प्रवाशांची संख्या वाढल्याचे चित्र आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावरून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर आणि रेल्वे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी तिकीट तपासनीसांची अनेक पथके तयार करण्यात आली असून अशा प्रवाशांकडून दंड वसूल केला जातो, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले. त्यानुसार पश्चिम रेल्वे प्रशासनाने २ हजार ३६३ तिकीट तपासनीसांचे पथक तयार करून विनातिकीट प्रवाशांकडून दंड वसूल केला. यासह अनारक्षित साहित्य मेल, एक्स्प्रेस आणि लोकलमधून घेऊन जाणाºया प्रवाशांच्या २५ लाख १७ हजार तक्रारी नोंदविल्या आहेत. या सर्व प्रवाशांकडून ११६.८६ कोटी रुपये दंड वसूल केला.
मोबाइल दल, सुरक्षिणी पथकाकडून कारवाई
लोकल आणि मेल, एक्स्प्रेसमध्ये तिकीट तपासण्यासाठी मोबाइल दल तयार करण्यात आले आहे. विनातिकीट आणि अनारक्षित सामान घेऊन प्रवास करणाºया प्रवाशांवर या पथकाद्वारे कारवाई केली जाते. या पथकात एकूण २५ कर्मचारी काम करत आहेत. तर, स्थिर दलाकडून स्थानकावरून विनातिकीट प्रवास करणाºया आणि अनारक्षित सामान घेऊन प्रवास करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. लोकलमधून उतरणाºया प्रवाशांवर लक्ष ठेवण्यासाठी ८ पथके आहेत. याशिवाय १३ पथके स्थानकावर कुठल्याही ठिकाणी उभे राहून रेल्वे नियम मोडणाºयांवर कारवाई करतात. या पथकात ‘सुरक्षिणी’ नावाचे पथक आहे. यात ३ महिला असून महिला प्रवाशांच्या समस्या सोडविण्याचे आणि विनातिकीट प्रवास करणाºया महिलांवर कारवाई करण्याचे काम हे पथक करते.