संक्रमण शिबिरात सुविधांची वानवा, स्थायी समिती सभा तहकूब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 02:09 AM2017-11-23T02:09:43+5:302017-11-23T02:09:45+5:30
तानसा जलवाहिनीवरून हटविण्यात आलेल्या प्रकल्पबाधितांना माहुलमधील संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात येणार आहे.
मुंबई : तानसा जलवाहिनीवरून हटविण्यात आलेल्या प्रकल्पबाधितांना माहुलमधील संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात येणार आहे. मात्र या ठिकाणी नागरी सुविधांचा अभाव असल्याने प्रशासनाचा हा निर्णय सर्वपक्षीय नगरसेवकांनी फेटाळून लावला आहे. या प्रकरणी बुधवारी झालेली स्थायी समितीची सभा तहकूब करण्यात आली.
एच पूर्व विभागातील जलवाहिनींच्या १० मीटर परिसरातील सुमारे दोन हजार झोपड्यांवर महापालिकेने कारवाई केली. पात्र झोपडीधारकांचे माहुल येथे स्थलांतर करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मात्र, या ठिकाणी कोणत्याही सोयी-सुविधा नसल्याने रहिवाशांनी येथे जाण्यास नकार दिला आहे. यापूर्वी महापौर विश्वनाथ महाडेश्वर व पालिका आयुक्त अजय मेहता यांनी माहुलच्या घरांची पाहणी करीत या ठिकाणी तत्काळ सोयी-सुविधा पुरविण्याचे आदेश दिले होते.
शाळा, रुग्णालये, वाहतूक व्यवस्था नाही. शाळा सुरू करण्यासही प्रशासनाकडून नकार दिला जात असल्याने मुलांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात आहे.
येथील समस्यांबाबत सर्वपक्षीय नगरसेवकांनी वैधानिक समिती व महासभेत वारंवार आवाज उठवला. मात्र, प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याविरोधात शिवसेनेचे नगरसेवक मंगेश सातमकर यांनी स्थायी समितीत सभा तहकुबी मांडली होती.
>सुविधा पुरविण्याचे आश्वासन
स्थायी समितीत या विषयावर सभा तहकूब झाल्यानंतर पालिकेतील गटनेत्यांनी महापालिका आयुक्त अजय मेहता यांची भेट घेतली. आधी सुविधा पुरवा व नंतर कारवाई करा, अशी मागणी नगरसेवकांनी केली. त्यावर आयुक्तांनी सुविधा पुरविण्याचे मान्य केले असून, त्यासाठी एका अधिकाºयाची नियुक्ती केली जाईल, असे आश्वासन गटनेत्यांना दिले.