'...अशा नमुन्यांना लावारिस करण्याची काळजी शेतकऱ्यांची मुलं घेतील'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 05:07 PM2019-03-29T17:07:03+5:302019-03-29T17:08:38+5:30
भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी ट्विटरवरुन शेतकऱ्यांच्या मुलांबाबत केलेल्या विधानामुळे सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जातोय
मुंबई - भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी ट्विटरवरुन शेतकऱ्यांच्या मुलांबाबत केलेल्या विधानामुळे सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जातोय. शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांनी अवधूत वाघ यांच्या वक्तव्याचा निषेध करत बेताल व निंदनीय वक्तव्य करणारे भाजपचे नेते, प्रवक्ते उत्तम नमुना आहेत. अशा नमुन्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातून आणि समाजकारणातून लावारीस करण्याची काळजी शेतकऱ्यांची मुलं नक्की घेतील असं प्रत्युत्तर दिलंय.
लायकी आणि अक्कल नसणारांना सत्ता मिळाली की काय होतं याचा अवधूत वाघ आणि अशीच बेताल व निंदनीय वक्तव्य करणारे भाजपचे नेते, प्रवक्ते उत्तम नमुना आहेत. अशा नामुन्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातून आणि समाजकारणातून लावारीस करण्याची काळजी शेतकऱ्यांची मुलं नक्की घेतील. pic.twitter.com/4rzSXM99dM
— Dr Ajit Nawale (@DrAjitNawale1) March 29, 2019
लायकी आणि अक्कल नसणारांना सत्ता मिळाली की काय होतं याचा अवधूत वाघ आणि अशीच अनेक भाजपाचे मंडळी करत असलेल्या उदाहरणावरुन कळून येते असा टोलाही अजित नवलेंनी भाजपाला लगावला.
भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ ट्विटरवर 'चौकीदार अवधूत वाघ' या अकाऊंटवरुन सक्रीय आहेत. याच अकाऊंटवरुन त्यांनी एक ट्विट करत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांची चेष्टा केली. मराठा क्रांती वॉरियर या ट्विटर हँडलवरुन करण्यात आलेल्या एका ट्विटला उत्तर देताना वाघ यांनी पातळी सोडली. शेतकरी पुत्र आणि सर्वसामान्यांचा आवाज असणाऱ्या असलेल्या पत्रकारांना ट्रोल करू नका, असा इशारा मराठा क्रांती वॉरियरकडून देण्यात आला होता. या ट्विटला 'आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची मुले अनाथ म्हणजे लावारिस असतात बाबा...', असं उत्तर वाघ यांनी दिलं. वाघ यांनी केलेल्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय.
अवधूत वाघ यांच्यासह अनेक भाजपा नेत्यांनी याआधीही वादग्रस्त विधाने केल्याने संताप व्यक्त करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी हे विष्णूंचे अकरावे अवतार असल्याचं ट्विट अवधूत वाघ यांनी केले होते. तर भाजपाचे आमदार प्रशांत पारिचारक यांनी शहीद जवानांच्या पत्नीबाबत केलेल्या विधानाने भाजपा चांगलीच अडचणीत आली होती. तूर खरेदीबद्दल भाष्य करताना भाजपा प्रदेशाध्यक्षांनी शेतकऱ्यांचा उल्लेख 'साले' असा केला होता. तर भाजपा आमदार राम कदम यांनी दहीहंडीच्या कार्यक्रमात मुलींना पळूवन आणण्याची भाषा केली होती. त्यामुळे निवडणुकीच्या काळात भाजपाच्या नेत्यांनी केलेली वादग्रस्त विधानांमुळे विरोधकांच्या हाती आयतं कोलीत सापडणार आहे.