विवाह संस्थेचे पावित्र्य संपुष्टात येण्याची भीती, ‘४९७’च्या निकालाबाबत प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 03:37 AM2018-09-28T03:37:01+5:302018-09-28T03:37:31+5:30
४९७ कलमाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावरून समाजात परस्परविरोधी प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सर्वाेच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे समाजातील अनैतिकता वाढेल व विवाह संस्थेचे पावित्र्य संपुष्टात येईल, अशी भीती वर्तवली जात आहे.
मुंबई - ४९७ कलमाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावरून समाजात परस्परविरोधी प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सर्वाेच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे समाजातील अनैतिकता वाढेल व विवाह संस्थेचे पावित्र्य संपुष्टात येईल, अशी भीती वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे या निर्णयामुळे व्यक्तीचे व्यक्तिस्वातंत्र्य महत्त्वाचे ठरवण्यात आल्याने या निकालाचे स्वागत केले जात आहे. या निकालाबाबत काही तज्ज्ञ, तसेच सर्वसामान्य नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रिया...
विवाहबाह्य संबंधाला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली किंवा दिलासा दिला, हा जो अर्थ लावला जातो आहे, तो चुकीचा आहे. सर्वोच्च न्यायालयाने कोणत्याही अनैतिक संबंधांना प्रोत्साहन दिलेले नाही. तसेच सूटही दिलेली नाही, अशा संबंधांमध्ये न्यायालयीन खटला झाला तर पूर्वी कायद्यातील तरतुदीनुसार पुरुषाला दोषी ठरवले जायचे. आता तसे होणार नाही.
- दुर्गा गुडीलू, अध्यक्षा, महाराष्ट्र वैदू विकास समिती
देशात पूर्वीपासून सुरू असलेल्या कुटुंब पद्धतीला धोका निर्माण होऊन समाजावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. निकालाचा पुनर्विचार होणे आवश्यक आहे.
- गॉडफ्रे पिमेंटा,
विश्वस्त, वॉचडॉग फाउंडेशन
भारतीय संस्कृती ही नैतिकतेच्या पायावर उभी आहे. अशा निर्णयामुळे तिला धोका निर्माण होत आहे.
- अमीर इद्रिसी, अध्यक्ष, असोसिएशन आॅफ मुस्लीम प्रोफेशनल्स
या निर्णयामुळे लग्नातील नाते, त्यातील विश्वास, संबंध चांगले राहतील यात शंका आहे. हिंदू विवाह कायद्यामध्ये घटस्फोटाच्या घटनेत विवाहबाह्य संबंध हा मानसिक छळ मानला जाईल.
- परेश देसाई, वकील, कुटुंब न्यायालय
या निकालामुळे व्यभिचाराला प्रोत्साहन मिळेल. भारतीय समाजाच्या दृष्टिकोनातून हा निकाल पोषक नाही. यामुळे समाजात चुकीचा संदेश जाण्याची भीती आहे.
- अॅड. दीपक मेश्राम,
प्राध्यापक, विधि महाविद्यालय
लग्नसंस्थेत स्त्रियांना आणि पुरुषांना वेगळे कायदे असणे चुकीचेच होते. मात्र यानंतर समानता आल्याने त्यात नक्कीच बदल होईल.
- तुषार राणे, सामान्य नागरिक
या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. यामुळे स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित होण्यास मदत होईल.
- रंजना कापडणे, गृहिणी
शारीरिक आकर्षण व केवळ शरीरसंबंध यासाठी विवाहबाह्य संबध असेल, तर ते नैतिकतेच्या दृष्टिकोनातून चुकीचे आहे.
- उदय नरे, शिक्षक, हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल
मुळात हा निकाल मला मान्य नाही, कारण या कारणामुळे घटस्फोट झाला तर दुसऱ्या जोडीदाराचे आयुष्य बेचिराख होण्याची भीती आहे.
- ज्योत्स्ना सवणूर, गृहिणी
पुढील आयुष्यात आपल्या आधीच्या नात्याला तडा जाणार नाही याची काळजी घ्यायला हवी.
- नम्रता तळेकर, विद्यार्थिनी