फलाटांवर खड्डे आणि छपराविना गोवंडी, पादचारी पूल असतानाही ओलांडले जात आहेत रेल्वे रूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 06:15 AM2017-10-26T06:15:57+5:302017-10-26T06:16:11+5:30
मुंबई : एल्फिन्स्टन रोड येथे झालेल्या दुर्घटनेनंतर मोठ्या प्रमाणात गर्दी असलेल्या रेल्वे स्थानकांवरील कमी आणि अरुंद पुलांच्या समस्येवर सर्वांनी बोट ठेवले
अक्षय चोरगे
मुंबई : एल्फिन्स्टन रोड येथे झालेल्या दुर्घटनेनंतर मोठ्या प्रमाणात गर्दी असलेल्या रेल्वे स्थानकांवरील कमी आणि अरुंद पुलांच्या समस्येवर सर्वांनी बोट ठेवले, परंतु गोवंडी रेल्वे स्थानकावर चार पादचारी पूल असूनही, येथील प्रवाशांचा जीव धोक्यात असल्याचे पाहायला मिळाले आहे. चार पादचारी पूल असूनही येथील प्रवासी रेल्वे पटरी ओलांडत असल्याचे निदर्शनास येते. महत्त्वाचे म्हणजे, येथील फलाटांवरील लाद्या उखडल्याने खड्डे पडले आहेत, शिवाय स्टेशन छपराविना आहे. परिणामी, गोवंडी रेल्वे स्थानकावर सुविधा पुरविण्यात रेल्वे प्रशासन अयशस्वी ठरले आहे आणि ज्या सुविधा रेल्वेने पुरविल्या आहेत, त्याचा वापरही येथील प्रवासी करत नाहीत, अशी खंत काही प्रवाशांनी व्यक्त केली आहे.
गोवंडी रेल्वे स्थानकावर चार पादचारी पूल आहेत. त्यापैकी उत्तरेकडील पुलाचा वापर होत नाही. दक्षिणेकडील पुलाचा वापर काही प्रमाणात केला जातो. मधल्या पुलावर तिकीट घर असल्यामुळे त्याही पुलाचा वापर होतो, परंतु हा पूल अतिशय अरुंद आहे.
एका वेळी जेमतेम तीन ते चार प्रवासी या पुलावरून ये-जा करू शकतात. त्यामुळे हा पूल रुंद करण्यात यावा, अशी मागणी प्रवासी सातत्याने करत आहेत. या पुलाचे रुंदीकरण प्रस्तावित असून, येत्या काळात या पुलाचे रुंदीकरण होणार आहे, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाºयांनी दिली.
एक वर्षापूर्वी पूर्व उपनगरांतील अधिक गर्दीची स्थानके असल्यामुळे मानखुर्द आणि गोवंडी या स्थानकांची पाहणी केली होती. त्या वेळी या दोन्ही स्थानकांवरील समस्या आणि सुविधांबाबत रेल्वेला माहिती देण्यात आली. दोन्ही स्थानकांवरील प्रसाधनगृहांची अवस्था बिकट असल्यामुळे प्रसाधनगृहांची नीट व्यवस्था करावी. स्कायवॉक, पादचारी पुलांचे रुंदीकरण आणि स्थानकांवरील स्वच्छतेबाबत विशेष मागण्या करण्यात आल्या आहेत.
- राहुल शेवाळे, खासदार
गोवंडी स्थानकावर प्रसाधनगृहांची मोठी समस्या आहे. त्यामुळे येथील प्रसाधनगृह सुरू करावे आणि त्याची नीट स्वच्छता ठेवावी, तसेच देवनारमधील नागरिकांसाठी देवनार ते गोवंडी रेल्वे स्थानक असा स्कायवॉक उभारावा, अशा मागण्या रेल्वेकडे करण्यात आल्या आहेत.
- दिनेश (बबलू) पांचाळ, माजी नगरसेवक
गोवंडी रेल्वे स्थानकावर पश्चिमेककडे तिकीट घर नाही. त्यामुळे पश्चिमेकडे तिकीट घराची व्यवस्था करण्यात यावी,
तसेच फलाट क्रमांक १वरील लाद्या उखडलेल्या आहेत, त्या लाद्या त्वरित दुरुस्त कराव्या.
- विनोद कदम, प्रवासी
गोवंडी आणि मानखुर्द स्थानकावर सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे या दोन्ही स्थानकांची पाहणी करणार आहे. स्थानकांचे सर्वेक्षण करून येथील अत्यावश्यक सेवा आणि सुविधांबाबत रेल्वेकडे मागण्या मांडणार आहे. - तुकाराम काते, आमदार
गोवंडी रेल्वे स्थानकावर प्रसाधनगृहाची अवस्था अतिशय बिकट आहे. त्यामुळे रेल्वेने प्रसाधनगृहांची व्यवस्था करावी. स्थानकावर छप्पर नाही, त्यामुळे रेल्वेने छपराची बसवायला हवे. बेशिस्त प्रवासी रेल्वे रूळ ओलांडतात. त्यांच्यावर कारवाई व्हावी.
- दीपाली शेवाळे, प्रवासी
रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक १वर छप्पर असायला हवे. दक्षिणेकडील पादचारी पुलावर छप्पर नाही, दिवे नाहीत. त्यांची व्यवस्था करायला हवी.
- राजू कळंत्रे, प्रवासी
सूचना, तक्रारी, व्हिडीओ
‘लोकमत’च्या वाचकांच्या ‘मुंबईचा ºहास आता बास’ या मालिकेसंदर्भात काही सूचना, प्रतिक्रिया असल्यास
८८४७७४१३०१
या क्रमांकावर कळवाव्या. लोकल स्थानकांच्या तक्रारीही या क्रमांकावर पाठवता येतील. स्थानकांतील समस्यांचे व्हिडीओदेखील वाचक या क्रमांकावर पाठवू शकतात.
निमुळत्या वाटा आणि फेरीवाले
गोवंडी रेल्वे स्थानकावरून बाहेर पडण्यासाठी फक्त दोनच रुंद वाटा आहेत. त्यामुळे सायंकाळी घरी जाणाºया प्रवाशांची या ठिकाणी कोंडी होते. त्यातच या ठिकाणी फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले असल्यामुळे या वाटा अधिकच अरुंद होतात. संबंधित प्रशासनाने येथील फेरीवाल्यांना हटवावे, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.
तिकीटघराची आवश्यकता
गोवंडी पश्चिमेला एकही तिकीट घर नसल्याने, प्रवाशांना मधल्या पुलावरील तिकीट घर अथवा, खासगी तिकीट विक्रेत्याकडून जादा पैसे देऊन तिकीट खरेदी करावे लागते. त्यामुळे स्थानकाच्या पश्चिमेला एक नवे तिकीट घर असावे, अशी मागणी प्रवासी करत आहेत. स्थानकाच्या पश्चिमेला तिकीट घरासाठी जागा नसल्याने, पश्चिमेला तिकीट घर तयार करणे कठीण असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.
भिकाºयांचा सुळसुळाट
गोवंडी रेल्वे स्थानकावर भिकाºयांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट आहे. स्थानकावरून बाहेर जाणाºया मार्गावर, पादचारी पुलांवर, तिकीट घरासमोर आणि फलाटांवरही भिकारी बिनधास्तपणे वावरत असतात. अनेकदा रेल्वे पोलीस भिकाºयांना हटकतात, परंतु भिकाºयांवर त्याचा कोणताही परिणाम होत नाही.
प्रसाधनगृह बंद आणि अस्वच्छ
गोवंडी रेल्वे स्थानकावर दोन प्रसाधनगृहे आहेत. त्यापैकी एक प्रसाधनगृह गेल्या काही वर्षांपासून बंद आहे. दुसरे प्रसाधनगृह अस्वच्छ असल्यामुळे त्याचा वापर खूपच कमी प्रमाणात होतो. त्यामुळे स्थानकावरील बंद असलेले प्रसाधनगृह त्वरित सुरू करावे आणि दोन्ही प्रसाधनगृहांची रेल्वेने स्वच्छता राखायला हवी, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.
प्रसाधनगृह चालकाला मारहाण
गोवंडी रेल्वे स्थानकातील दोन्ही प्रसाधनगृहे पूर्वी सुरू होती. प्रसाधनगृह सांभाळण्यासाठी चालक नेमला होता. प्रसाधनगृहाच्या वापरानंतर प्रत्येकी एक रुपया घेतला जात होता, परंतु प्रवाशांनी प्रसाधनगृहाच्या चालकाला मारहाण केली. चालकाला मारहाण करण्याच्या चार-पाच घटना घडल्यामुळे, हे प्रसाधनगृह चालकाअभावी बंद पडले. आता त्याचा वापर होत नाही.
पालिकेच्या पुलावर
रेल्वेने दिवे बसवावे?
गोवंडी येथील प्रवासी रेल्वे रूळ ओलांडतात, त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी पालिकेने गोवंडी स्थानकाच्या उत्तरेला नवा पादचारी पूल उभारला. दोन वर्षांपूर्वी त्याचे लोकार्पण करण्यात आले. या पुलावर दिवे नाहीत, छत नाही, त्यामुळे पुलाचा वापर एकही प्रवासी करत नाही. याउलट रात्रीच्या वेळी या पुलावर गर्दुल्ले बसतात. रेल्वेने या पुलावर दिव्यांची व्यवस्था करावी, अशी विनंती पालिकेकडून रेल्वेला करण्यात आली आहे, असे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.
रेल्वेला उशिरा जाग
दोन आठवड्यांपूर्वी रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी गोवंडी रेल्वे स्थानकाची पाहणी केली आहे. गोवंडी रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक १ची दुरुस्ती, फलाटावरील छत आणि प्रसाधनगृहासह अनेक नव्या सेवा-सुविधा गोवंडी स्थानकावर प्रस्तावित केल्या असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली, परंतु विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना सर्व स्थानकांच्या सर्वेक्षणाची पाहणी करण्यासाठी एल्फिन्स्टन रोडसारख्या दुर्घटनांची वाट का पाहावी लागते? असा सवालही प्रवाशांनी केला आहे.