महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने मोठा गाजावाजा करीत सुरू केलेल्या ‘शिवशाही’चे रूपडे पालटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 06:30 AM2017-11-23T06:30:35+5:302017-11-23T06:32:28+5:30
मुंबई : पाच महिन्यांपूर्वी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने मोठा गाजावाजा करीत सुरू केलेल्या ‘शिवशाही’ बससेवेबाबत प्रवाशांच्या तक्रारी लक्षात घेऊन, आता त्यामध्ये मोठे बदल करण्यात येणार आहेत.
महेश चेमटे
मुंबई : पाच महिन्यांपूर्वी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने मोठा गाजावाजा करीत सुरू केलेल्या ‘शिवशाही’ बससेवेबाबत प्रवाशांच्या तक्रारी लक्षात घेऊन, आता त्यामध्ये मोठे बदल करण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सीटबेल्ट आणि सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात येणार असून, प्रवाशांसाठी मोफत वाय-फाय, प्रभावी वातानुकूलित यंत्रणेसाठी चालकांसाठी केबिन पार्टिशनची व्यवस्था करण्यात येणार आहे. नव्या धाटणीच्या नव्याने बांधणी करण्यात येणाºया १९०० गाड्यांमध्ये हा बदल करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
एसटीची ‘ड्रीम बस’ म्हणून जून महिन्यात शिवशाही महामंडळात दाखल झाली. मात्र, त्यामध्ये प्रवाशांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी महामंडळाने तंत्रज्ञान, वाहतूक आणि नियोजन विभागातील वरिष्ठ अधिकाºयांची समिती नेमली. समितीने प्रवाशांच्या सर्व तक्रारी आणि सूचना जाणून घेत अहवाल सादर केला. त्यातील शिफारसी नुकत्याच झालेल्या महामंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आल्या. त्यानुसार, नव्याने बांधण्यात येणाºया शिवशाहीमध्ये बदल करण्याच्या सूचना संबंधित कंपनीला देण्यात आली आहे.
प्रवाशांच्या तक्रारी तपासून घेण्यात आल्या आहेत. समितीनेदेखील प्रत्यक्ष प्रवास करत तक्रारी व अडचणींची शहानिशा केली. संबंधित आॅपरेटर कंपन्यांना तातडीने तक्रारी निवारण्याच्या सूचना केल्या आहेत. नव्याने बांधण्यात येणाºया शिवशाहीमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसह मनोरंजनावरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. एकूण २००० शिवशाहीपैकी ७६४ शिवशाही मार्च २०१८ पर्यंत एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.
।डिसेंबरपासून महिन्याला ३० शिवशाही एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यानुसार, प्रत्येक विभागाचे नियोजन महामंडळाने केले आहे.
विभाग शिवशाही
मुंबई २००
पुणे २१८
नाशिक ९४
औरंगाबाद १६०
अमरावती ३२
नागपूर ६०
एकूण ७६४