Ganpati Festival : भेटा पोलीस बाप्पाला; मुंबई पोलीस अधिकाऱ्याने घरी आणलीय आगळी गणेशमूर्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 03:55 PM2018-09-14T15:55:44+5:302018-09-14T17:08:44+5:30
विले पार्ले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे यांच्या घरी 'पोलीस बाप्पा'चे स्वागत
मुंबई - गणेशोत्सवात सर्वत्र आनंदाचे वातावरण असून बाप्पाची नानाविध रूप भाविक साकारतात. तसंच विले पार्ले पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे यांनी आपल्या विले पार्लेतील राहत्या घरी दुसऱ्यांदा पोलिसांच्या गणवेशातील अतिशय मनमोहक बाप्पाची प्रतिष्ठापणा केली आहे.
निरीक्षक राजेंद्र काणे यांनी पोलिसांच्या वर्दीतील श्रीगणेशाच्या मूर्तीसह देखाव्याची सजावट म्हणून विले पार्ले पोलीस स्टेशन उभारले आहे. देखावा म्हणून उभारण्यात आलेल्या पोलीस स्टेशनच्या प्रतीकृतीत पोलीस वर्दीतील पोलीस निरीक्षक गणेश हा लाकडी खुर्चीत बसून जनतेने पोलिसांशी कसा संवाद साधला पाहिजे, जनतेने आपली स्वत:ची काळजी कशी घ्यावी याबाबत संदेश देत आहे. या पोलीस स्टेशनमध्ये लोकमान्य टिळकांचे व छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र लावण्यात आले आहे. पोलीस ठाण्यात पोलिसांचे ब्रीदवाक्य "सद्रक्षणाय खलनिग्रहणाय" सुद्धा लिहिले आहे. अशा आगळ्यावेगळ्या संकल्पनेबद्दल काणे यांना विचारले असता त्यांनी मी लहान होतो, त्यावेळी कोल्हापूर येथील लाईनबाजारमध्ये ५ वीला शिकत असताना वर्गातल्या शिक्षकांनी गणेशोत्सवात शिक्षकाच्या वेशातील गणेशमूर्तीची स्थापना केली होती. त्यावरून मला ही संकल्पना सुचली. पोलीस विभागात काम करत असताना त्याच क्षेत्रातील गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करण्याचे स्वप्न मनात होते. त्यामुळे अशी पोलिसांच्या वर्दीतील मूर्तीची स्थापना गेल्या वर्षी आणि यंदा केली आहे. यासाठी ३ ते ४ वर्षांपासून मी प्रयत्न करत होतो. अखेर अथक प्रयत्नानंतर गेल्या वर्षांपासून गणेशाची मूर्ती पोलिसांच्या वर्दीतील स्थापन केली असून मुंबईतील पोलीस स्टेशनची प्रतिकृती देखावा म्हणून साकारला आहे.
पोलीस आणि समाज, समाजातील जनता यांच्यामधील दरी दूर करून सुसंवाद वाढवण्याचा प्रयत्न असल्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे यांनी सांगितले. तसेच हि गणेशाची मूर्ती निलेश दादा आणि विले पार्ले पोलीस स्टेशनचा हुबेहूब देखावा कमलेश मांजरेकर यांनी साकारला आहे. माझ्या घरी गेल्या ४० वर्षांपासून गणपती येतो. मात्र गेल्या वर्षीपासून आम्ही पोलीस बाप्पा आणायला सुरुवात केली. गेल्या वर्षी मी जनजागृतीपर एक चित्रफीत बनवली होती. यंदा पोलीस आणि जनता यांच्यात सुसंवाद निर्माण करणारे गाणे तयार केले आहे. उद्या ते गाणे आम्ही रिलीज करणार आहोत अशी माहिती काणे यांनी दिली.