विकासदर घसरणार , ६.५ टक्क्यांवर येण्याचा केंद्र सरकारचा अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 05:40 AM2018-01-06T05:40:52+5:302018-01-06T10:03:44+5:30
०१७-१८ चा जीडीपी ६.५ टक्क्यांवर येण्याचा अंदाज केंद्र सरकारच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. खरिपात चांगली पिके आली असली तरी कृषी, उत्पादन क्षेत्रात घट होईल आणि बांधकाम व खनिज कर्म क्षेत्र सकारात्मक राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मुंबई - २०१७-१८ चा जीडीपी ६.५ टक्क्यांवर येण्याचा अंदाज केंद्र सरकारच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. खरिपात चांगली पिके आली असली तरी कृषी, उत्पादन क्षेत्रात घट होईल आणि बांधकाम व खनिज कर्म क्षेत्र सकारात्मक राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
केंद्रीय सांख्यिकी व नियोजन विभागाने शुक्रवारी हे अंदाज जारी केले. त्यामध्ये २०१७-१८ या आर्थिक वर्षात देशाचे ढोबळ राष्टÑीय उत्पादन २०१६-१७ च्या ७.१ टक्क्यांच्या तुलनेत यंदा ६.५ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. देशाच्या एकूण उत्पादकतेचा निर्देशांक ‘जीव्हीए’ द्वारे मांडला जातो. हा जीव्हीए २०१७-१८ मध्ये मागीलवर्षीच्या ६.६ टक्क्यांच्या तुलनेत ६.१ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र देशाचे दरडोई उत्पन्न ८२ हजार २६९ रुपयांच्या तुलनेत ८६ हजार ६६० रुपये राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या अंदाजांनुसार २०१८-१९ मध्ये जीडीपी आणखी मजबूत होईल. तो ७ टक्क्यांचा टप्पा पार करू शकेल, असे निती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार यांनी सांगितले.