पावसाच्या हुलकावणीच्या अंदाजामुळे यंदा मुंबईतील दहीहंडीत गोविंदा कोरडाच राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2018 02:53 AM2018-09-03T02:53:24+5:302018-09-03T02:53:38+5:30
राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाची नोंद होत असतानाच मुंबई शहर आणि उपनगर मात्र पावसाविना कोरडेच आहे. एखाद-दुसरी आलेली श्रावणसर वगळता मुंबई कोरडीच आहे. ६ सप्टेंबरपर्यंत मुंबईला पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही.
मुंबई : राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाची नोंद होत असतानाच मुंबई शहर आणि उपनगर मात्र पावसाविना कोरडेच आहे. एखाद-दुसरी आलेली श्रावणसर वगळता मुंबई कोरडीच आहे. ६ सप्टेंबरपर्यंत मुंबईला पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही. परिणामी मुंबईकरांना आणखी काही दिवस पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे सोमवारी मुंबई शहर आणि उपनगरात साजऱ्या होणाºया दहीहंडीत गोविंदा कोरडाच राहणार आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून उत्तर कोकणाला पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही. उत्तर कोकणात मुंबई, ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यांचा समावेश होतो. पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबईतला उकाडा पुन्हा एकदा वाढल्याचे चित्र आहे.
पालकांवरही होणार कारवाई
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर २०१४ पासून दहीहंडीच्या उंचीवर निर्बंध आले आहेत. थरांमध्ये १४ वर्षांखालील मुला-मुलींना सहभागी करण्यास बंदी असल्याने पोलिसांचे त्याकडे लक्ष असणार आहे. थरांमध्ये कमी वयोगटातील मुले आढळल्यास पथकासोबतच आता त्यांच्या पालकांवरही कारवाई करणार असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले.