मुंबापुरीत दुमदुमणार गोविंदांचा ‘शोर’; नोटाबंदी, जीएसटीचा आयोजकांना फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2018 04:43 AM2018-09-03T04:43:27+5:302018-09-03T07:36:56+5:30
गेल्या २० ते २५ दिवसांपासून सुरू असलेला थरांचा सराव, प्रायोजकत्व मिळविण्यासाठीची धडपड, मोठ्या रकमेच्या हंड्या फोडण्याचा मानस, स्पर्धेसह तितकेच खेळीमेळीचे वातावरण आणि थरांवर थर रचण्यासाठी सुरू असलेला उत्साह; असे सारे काही ‘याची देही याची डोळा’ पाहण्याचा योग मुंबईकरांना सोमवारी मिळणार आहे.
मुंबई : गेल्या २० ते २५ दिवसांपासून सुरू असलेला थरांचा सराव, प्रायोजकत्व मिळविण्यासाठीची धडपड, मोठ्या रकमेच्या हंड्या फोडण्याचा मानस, स्पर्धेसह तितकेच खेळीमेळीचे वातावरण आणि थरांवर थर रचण्यासाठी सुरू असलेला उत्साह; असे सारे काही ‘याची देही याची डोळा’ पाहण्याचा योग मुंबईकरांना सोमवारी मिळणार आहे. औचित्य आहे ते दहीहंडीचे. शहर आणि उपनगरात राजकीय हंड्यांपासून सामाजिक हंड्यांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेषत: थर रचण्यासाठीची स्पर्धा दिवसभर रंगणार असतानाच सुरक्षेची काळजी गोविंदांना घ्यावी लागणार आहे. सकाळीच आपल्या मंडळाच्या हंडीला सलामी देत घराबाहेर पडणारा गोविंदा ‘मच गया शोर सारी नगरी मे...’ म्हणत मुंबापुरीच्या उत्साहात भर टाकेल.
शहराचा विचार करता भायखळा, गिरगाव, वरळी, लालबाग, दादर, माहीम, प्रभादेवी, माटुंगा आणि धारावी परिसरात राजकीय नेत्यांसह मंडळांच्या हंड्या गोविंदांचे लक्ष वेधून घेणार आहेत. उपनगरात राजकीय हंड्यांची संख्या अधिक असून, त्या फोडण्यासाठी अधिकाधिक गोविंदांची पथके दाखल होणार आहेत.
हंडीत देणार व्यसनमुक्तीचा संदेश
गोकुळाष्टमीनिमित्त पश्चिम उपनगरात वर्सोवा, दिंडोशी, बोरीवली दहिसर येथे मानाच्या हंड्या फुटणार आहेत. बोरीवली (पूर्व) येथे शिवसेना मागाठाणे विधानसभा व तारामती चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार प्रकाश सुर्वे यांनी ‘मागाठाणे दहीकाला महोत्सवा’चे आयोजन देवीपाडा मैदानात केले आहे. या वेळी तंबाखू, गुटखा व्यसनमुक्तीसह पर्यावरणपूरक संदेश दिला जाणार आहे. येथे सलामीसाठी महिला गोविंदा पथकाला प्राधान्य देण्यात येणार असून, थरांच्या रकमेव्यतिरिक्त महिला गोविंदा पथकांना ५ हजार रुपयांचे प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात येणार आहे. या ठिकाणी मुंबई, ठाणे येथील सुमारे १०० गोविंदा पथके सलामी देणार आहेत
पहिली सलामी शहिदांना!
संस्कार प्रतिष्ठान आयोजित दहिसरच्या मानाच्या दहीहंडीत पहिली सलामी शहीद जवानांना दिली जाणार आहे. दहिसर स्पोटर््स फाउंडेशन येथे दहीहंडीच्या कार्यक्रमाला शहीद शुभम सूर्यकांत मुस्तापुरे यांचे कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत. यंदा ११ लाखांची हंडी आहे, असे नगरसेविका तेजस्वी घोसाळकर व अभिषेक घोसाळकर यांनी सांगितले.
वेसावेत पारंपरिक ‘हंडी’
सर्वत्र मानवी मनोरे रचून दहीहंडीची प्रथा सर्वश्रुत आहे. मात्र, वेसावे कोळीवाड्यात लांब लाकडी काठीला अणुकुचीदार भाला बांधून दहीहंडी फोडण्याची येथील पुरातन परंपरा आहे. यंदा येथील वेसावा बुधा गल्ली कोळी समाज संस्थेला नऊ वर्षांनी दहीहंडी फोडण्याचा मान मिळाला आहे, अशी माहिती या गल्लीचे अध्यक्ष राजहंस लाकडे यांनी दिली. तत्पूर्वी मानाच्या हंडीची भव्य मिरवणूक सकाळी आठ वाजता वेसावे गावातून काढली जाणार आहे. मिरवणूक सकाळी अकराच्या सुमारास राम मंदिर येथे आल्यानंतर विद्यमान अध्यक्षांच्या हस्ते हंडी फोडण्यात येणार आहे. त्यानंतर वेसावे गावातील नवसाच्या हंड्या सायंकाळी ६ वाजेपर्यंत फोडल्या जाणार आहेत.
मानाच्या हंड्या
वर्सोव्यात सचिन शिवेकर युवामंच आयोजित ५ लाख ५५ हजारांची मानाची हंडी फुटणार आहे. वर्सोवा, सातबंगला, वटवेश्वर मंदिर येथे रामगिर बाबा जनकल्याण समितीचे अध्यक्ष सचिन शिवेकर यांनी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे.
शिवसेना दिंडोशी विधानसभा पुरस्कृत व कल्पतरू युवा प्रतिष्ठानच्या वतीने दिंडोशीत मानाची हंडी मालाड पूर्व, कुरार गाव, त्रिवेणीनगर, आकांक्षा इमारतीसमोर आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार सुनील प्रभू यांनी दिली.
प्रायोजकांची पाठ; आयोजक धास्तावले
मुंबईत मोठ्या थरांसाठी लाखोंच्या दहीहंड्या व आकर्षक बक्षिसांची रेलचेल होती. मात्र, ८ नोव्हेंबर २०१६ च्या नोटाबंदी आणि १ जुलै २०१७ पासून देशात लागू केलेल्या जीएसटीमुळे उद्योगधंद्यांवर मंदीचे सावट आले असून, याचा काहीसा परिणाम दहीहंडीवरही पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे प्रायोजकांनी दहीहंडी उत्सवासाठी मदतीचा हात आखडता घेतला आहे. याकारणास्तव शहरासह पश्चिम उपनगरातील दहीहंडी उत्सवाच्या आयोजकांनी बक्षिसांच्या रकमेत आणि उत्सवाच्या खर्चावर कपात केली आहे.
सेलिब्रेटींचे मोठे मानधन, त्यातच प्रायोजकांनी पाठ फिरवल्यामुळे मंडळांनी सेलिब्रेटीच्या खर्चात कपात केली आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका येत्या सहा ते सात महिन्यात एकत्र किंवा वेगळ्या होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दहीहंडीनंतर येणारे गणपती, नवरात्र, दिवाळी हे सण आणि निवडणूकीचा मोठा खर्च लक्षात घेता पैसा कुठून आणायचा? असे अनेक प्रश्न राजकीय पक्षांसमोर आहे.
शिवसेना-राष्ट्रवादी आमनेसामने
वरळी येथील जांभोरी मैदानात यंदा शिवसेनेची दहीहंडी साजरी होणार आहे. जांभोरीतील दहीहंडीवरून विद्यमान शिवसेना आमदार सुनील शिंदे आणि माजी आमदार राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्यात वादाला तोंड फुटले होते. संकल्प प्रतिष्ठान १५ वर्षांपासून जांभोरी मैदानात दहीहंडीचे आयोजन करत आहे. यंदा परवानगीसाठी सर्वप्रथम अर्ज करूनही आम्हाला परवानगी नाकारण्यात आली. शिवसेना दादागिरी करत दहीहंडीचे आयोजन करत आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा प्रकार सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून केला जात आहे.
यावर १५ वर्षांचा दावा करणारे गेले चार वर्षे कुठे होते, चार वर्षे जांभोरीत दहीहंडी का साजरी केली नाही, असा प्रश्न शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी विचारला आहे. शिवसेनेची दहीहंडी साधी आणि पारंपरिक पद्धतीने असणार आहे. डीजे वगैरे प्रकारांना आम्ही फाटा दिला आहे. साधेपणाने आणि काटकसरीने जांभोरीत दहीहंडी साजरी केली जाईल आणि त्यातून वाचलेली रक्कम केरळच्या पूरग्रस्तांना मदत म्हणून पाठविण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
दादागिरीने परवानगी मिळाल्याचा आरोप करणाऱ्यांनी आधी नियम समजून घ्यावेत. शिवसेनेला नियमानेच परवानगी मिळालेली आहे. आमची परवानगी नियमबाह्य असेल तर त्यांनी वैधानिक मार्गाने त्याला आव्हान द्यावे, दाद मागावी. चार वर्षे हंडीचे आयोजन न करणाºयांनी आता उगाच आव आणू नये, असा टोलाही शिंदे यांनी लगावला.
सेलीब्रिटींचा सहभाग, झगमगाटामुळे संकल्प प्रतिष्ठानच्या जांभोरीतील हंडीने स्वत:ची ओळख निर्माण केली होती. मुंबई-ठाण्यातील प्रमुख हंड्यांमध्ये संकल्पच्या हंडीचे नाव घेतले जायचे. यंदा मात्र येथे शिवसेनेची हंडी होणार आहे. साधेपणाने, पारंपरिक पद्धतीने फक्त सकाळी १० ते दुपारी २ या कालावधीत आमची हंडी साजरी केली जाईल, असे शिवसेनेकडून आमदार शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.